CoronaVirus News : कोरोनाग्रस्त रुग्णाला कसे मिळणार वेळेत उपचार?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 12:33 AM2020-06-23T00:33:38+5:302020-06-23T00:33:44+5:30
अवघ्या काही दिवसांतच ही सर्व यंत्रणा कोलमडून पडली आहे. त्यामुळे रुग्णांना वेळेत उपचार तर सोडाच अॅम्ब्युलन्स असूनही वेळेत मिळत नाही.
ठाणे : कोरोनाग्रस्तांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी कंट्रोल रूम तयार करून, रुग्णाला हॉस्पिटल कोणते मिळू शकते, कुठे किती बेड्स शिल्लक आहेत, याची अद्ययावत माहिती देण्यासाठी एक अॅपही तयार करण्यात आले होते. परंतु, अवघ्या काही दिवसांतच ही सर्व यंत्रणा कोलमडून पडली आहे. त्यामुळे रुग्णांना वेळेत उपचार तर सोडाच अॅम्ब्युलन्स असूनही वेळेत मिळत नाही.
ठाणे महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या सहा हजारांच्या पुढे गेली आहे. दररोज १५0 ते २00 रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळणेही दुरापास्त झाले आहे. रविवारी एका रुग्णाला दोन दिवस अॅम्ब्युलन्स न मिळाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. महापालिकेने शहरात १00 हून अधिक अॅम्ब्युलन्स उपलब्ध केल्या आहेत. तरीदेखील रुग्णांचे हाल होत आहेत.
ठाणे परिवहन सेवेने ३0 बसचे अॅम्ब्युलन्समध्ये रूपांतर केले खरे, मात्र त्यामध्ये तंत्रज्ञाचे कामही चालकाला करावे लागत आहे. याशिवाय व्हेंटिलेटरची कमतरता दिसत आहे. त्यामुळे एखाद्याने कॉल करून रुग्णवाहिका मागवली, तर व्हेंटिलेटर नाही, त्यात बिघाड असल्याचे सांगितले जात आहे.
>डॉक्टरही कंटाळले
ठामपाने बेडची माहिती अॅपद्वारे देणे सुरू केले होते. त्यासाठी महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन कक्षात कंट्रोल रूमही तयार केली आहे. तेथे तीन शिफ्टमध्ये एकेक डॉक्टरची नियुक्ती केली आहे. परंतु, आता तेथील डॉक्टरही कॉल घेऊन कंटाळले असून, ते कॉल घेण्यास असमर्थता दर्शवित आहेत. त्यामुळे रुग्णाला चार ते पाच तास खोळंबत राहावे लागत आहे.
>कोरोनावर मात केलेल्या पोलिसाचे स्वागत... भिवंडी : शहरातील शांतीनगर पोलीस ठाणे येथे नेमणुकीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला १ जूनला कोरोनाची लागण झाली होती. त्याच्यावर खारेगाव येथे उपचार सुरू होते. शेवटची तपासणी निगेटिव्ह आल्याने त्यांना १२ जूनला घरी पाठवण्यात आले. सात दिवस होम क्वारंटाइन राहिल्यानंतर हा पोलीस कर्मचारी कर्तव्यावर हजर झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसोझा यांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्याचे पुष्पवर्षाव करून स्वागत केले. या अभूतपूर्व स्वागताने पोलीस कर्मचाºयाच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले होते.