CoronaVirus News : माणुसकी हरवली! मृतदेह घेण्यास कुटुंबीयांचाच नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 12:30 AM2020-06-23T00:30:00+5:302020-06-23T00:30:25+5:30
तर सख्या भावाने मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. यामुळे गेले चार दिवस अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत हा मृतदेह कळवा रुग्णालयात खितपत पडला आहे.
ठाणे : कोरोनामुळे सध्या नातीगोती आणि माणुसकीचे अनेक चांगलेवाईट अनुभव समोर येत आहेत. कोरोनाच्या धास्तीने इतर आजारांनी बळी पडलेल्यांच्या नशिबीही मृत्यूनंतर दु:स्वास येत आहे. ठाण्यातील शारीरिक व्याधीने त्रस्त असलेल्या एका व्यक्तीला स्थानिक समाजसेवकांनी सरकारी रु ग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर नातलग व निकटवर्तीयांनी त्याच्याकडे पाठ फिरवली. तर सख्या भावाने मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. यामुळे गेले चार दिवस अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत हा मृतदेह कळवा रुग्णालयात खितपत पडला आहे.
ठाणे पूर्वेकडील पारशीवाडीतील बाळ सराफ चाळीनजीकच्या घरात एक ५८ वर्षीय गृहस्थ एकटेच राहतात. खासगी बिल्डरकडे नोकरी करून उदरिनर्वाह करणाऱ्या या गृहस्थास कंबरेच्या खाली शारीरीक व्याधी जडली होती. हा आजार बळावल्याने ते घरातच तडफडत होते. याची माहिती मिळताच १७ जून रोजी मध्यरात्री काँग्रेसचे स्थानिक समाजसेवक कृष्णा भुजबळ यांनी तत्काळ धाव घेऊन काँग्रेस शहर अध्यक्ष मनोज शिंदे व शिवसेनेच्या हेमंत पमनानी आदिंच्या सहकार्याने त्यांना ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारार्थ हलवले. परंतु, कोरोना नसतानाही उपचारादरम्यान १८ जून रोजी पहाटेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
>मृताच्या घरास टाळे लावून
भावाने ठोकली धूम
रुग्णाच्या मृत्यूची माहिती मिळताच पुन्हा भुजबळ यांनी रु ग्णालय गाठून मृताचे भाऊ, जावई व नातलगांना कळवले. मात्र, साऱ्यांनीच पाठ फिरवली. अखेर महाड येथील सख्ख्या भावाला मृताच्या नावावर घर असल्याचे कळवताच घराच्या लोभाने रु ग्णाचा भाऊ ठाण्यात अवतरला. परंतु, रु ग्णालयातून शव ताब्यात घेण्याऐवजी या लोभी भावाने नात्यागोत्याला काळिमा फासून मृत भावाच्या पारशीवाडीतील घराला टाळे लावून चक्क धूम ठोकली.
>चार दिवसांपासून मृतदेह पडून
वारंवार फोन करूनही नातलग येत नसल्याने मृताचे शेजारीपाजारी संतापले असून सख्खा भाऊदेखील जबाबदारी स्वीकारायला तयार नसल्याची माहिती भुजबळ यांनी दिली. यामुळे चार दिवसांपासून त्यांचा मृतदेह कळवा रुग्णालयातील शवागारातच बेवारस स्थितीत पडून असल्याची माहिती रु ग्णालय प्रशासनाने दिली.