CoronaVirus News: ‘कुटुंब’ घरी नसतानाच ‘जबाबदारी’ उरकायची घाई

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2020 11:55 PM2020-10-06T23:55:51+5:302020-10-06T23:56:13+5:30

मुख्यमंत्र्यांच्या मोहिमेला हरताळ; बंद घरांबाहेर स्टिकर चिकटवून अथवा आरोग्य तपासणी न करताच गेले स्वयंसेवक

CoronaVirus News: Hurry to fulfill 'responsibility' when 'family' is not at home | CoronaVirus News: ‘कुटुंब’ घरी नसतानाच ‘जबाबदारी’ उरकायची घाई

CoronaVirus News: ‘कुटुंब’ घरी नसतानाच ‘जबाबदारी’ उरकायची घाई

Next

कल्याण : डोंबिवली, कल्याण ही मुख्यत्वे नोकरदारांची शहरे असून, येथील बहुतांश कुटुंबे कामानिमित्त बाहेर असताना, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेकरिता येणारे स्वयंसेवक चक्क त्या कुटुंबाचे सर्वेक्षण झाल्याचे स्टिकर दरवाजाबाहेर चिकटवून निघून जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या महत्त्वाकांक्षी योजनेवर त्यांच्या सासुरवाडीत बोळा फिरवला जात आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कल्याण, डोंबिवली या शहरांत वाढत असल्याने त्यावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केडीएमसीतही ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम १५ सप्टेंबर ते २५ आॅक्टोबर या कालावधीत राबविण्याचे जाहीर केले. महापालिकेने तयार केलेल्या पथकांनी घरोघरी भेट देऊन प्रत्येक घरातील सदस्यांची आॅक्सिजन पातळी व तापमान तपासणे गरजेचे आहे. काही ठिकाणी हे काम जबाबदारीने होत असताना काही भागांमध्ये सर्वेक्षण गांभीर्याने केले जात नाही, असे आरोप नागरिक करीत आहेत. डोंबिवली पूर्वेकडील अयोध्यानगरी परिसरात बंद असलेल्या घरांच्या बाहेर सर्वेक्षण केल्याचे स्टिकर चिकटवून स्वयंसेवक निघून गेले.

पूर्वेकडीलच छेडा रोड आणि पेंडसेनगरमध्ये घरातील सदस्यांची वैद्यकीय तपासणी न करता केवळ तोंडी माहिती घेऊन स्वयंसेवक निघून गेले, अशाही तक्रारी आहेत. अर्थात, काही भागांत सर्वेक्षणाला येणाऱ्यांना रहिवाशांकडून अपमानास्पद वागणूक दिली जात आहे, हीदेखील वस्तुस्थिती आहे.

लस देताना सर्वेक्षणाचा तपशील महत्त्वाचा
कल्याण : वेगवेगळ्या शहरांमधील सर्वेक्षणातील माहिती ही भविष्यात जेव्हा लस उपलब्ध होईल तेव्हा महत्त्वाची ठरणार आहे. लस ही प्रामुख्याने डॉक्टर,पोलीस व आपत्कालीन सेवेतील कर्मचाऱ्यांना दिली जाईल. याखेरीज ज्या कुटुंबात मधूमेह, रक्तदाब, कर्करोग, मूत्रपिंड विकाराचे रुग्ण आहेत त्यांना मुख्यत्वे लस दिली जाऊ शकते. ज्या घरात ६५ वर्षे व त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती आहेत त्यांनाही प्राधान्याने लस दिली जाऊ शकते. त्यामुळे याकरिता हे सर्वेक्षण महत्त्वाचे आहे. मात्र, जर स्वयंसेवक बंद घराचे सर्वेक्षण झाले असे भासवत असतील, तर त्यामुळे भविष्यात फसगत होण्याची भीती आहे.

घरातील सदस्यांना कोणता आजार आहे, याची माहिती सर्वेक्षणात घेतात, पण वैद्यकीय तपासणी केली जात नाही, परंतु तपासणी झाली म्हणून कार्ड दिले जात आहेत. एक प्रकारे या मोहिमेला हरताळ फासला जात आहे
- रितेश गोहील, रहिवासी देढीया निवास, छेडा रोड, डोंबिवली, पूर्व

मोहिमेत तपासणीसाठी स्वयंसेवक आले होते, परंतु त्यांनी कोणतीही वैद्यकीय तपासणी केली नाही. केवळ घरातील सदस्यांची माहिती घेतली.
- श्रीनंद कºहाडकर, पेंडसेनगर, आनंददीप सोसायटी

काही ठिकाणी सर्वेक्षणाला विरोध होत आहे. त्यामुळे आम्ही पोलीस बंदोबस्त मागितला आहे, परंतु सर्वेक्षणा दरम्यान जर कोणी वैद्यकीय तपासणी न करता सर्वेक्षण झाल्याची नोंद करीत असेल, तर त्याची तत्काळ दखल घेऊन कारवाई केली जाईल.
- डॉ प्रतिभा पानपाटील, साथरोग विभाग प्रमुख, केडीएमसी


ठाण्याच्या मोहिमेत सावळागोंधळ
मध्यवर्ती भाग पूर्ण: इतर भागात घराला स्टिकर

- अजित मांडके
ठाणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या ‘माझे कुटुंब - माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत ५५७ पथकांच्या माध्यमातून आतापर्यंत १२ लाख ३१ हजार १२ नागरिकांच्या आरोग्याचे सर्वेक्षण पूर्ण केल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेने दिली आहे; परंतु प्रत्यक्षात या मोहिमेत सावळागोंधळ सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात योग्य सर्वेक्षण झाले असून इतर भागांत मात्र केवळ घराला स्टिकर लावण्यापुरते सर्वेक्षण झाल्याची माहिती समोर आली आहे.

ठाणे पालिका क्षेत्रामध्ये ही मोहीम १८ सप्टेंबरपासून राबविण्यात येत आहे. त्यासाठी ५५७ हून अधिक पथके प्रत्येक कुटुंबाच्या आरोग्याचे सर्वेक्षण करीत आहेत. त्यानुसार सोमवारपर्यंत ४ लाख ७ हजार १०६ कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत घरोघरी जाऊन कोणाला ताप किंवा इतर आजार आहेत का, याची माहिती घेतली जात आहे. शिवाय थर्मल गनने प्रत्येकाच्या शरीराचे तापमान मोजले जात आहे. त्यानुसार शहरातील नौपाडा, महापालिका मुख्यालयाचा भाग असेल किंवा जांभळी नाका परिसरात पालिकेच्या या पथकांनी योग्य सर्वेक्षण केल्याची माहिती येथील रहिवाशांनी दिली आहे.

परंतु झोपडपट्टी भागात या मोहिमेला हरताळच फासला गेल्याचे चित्र दिसत आहे. घोडबंदर, मुंब्रा, दिवा किंवा वागळे पट्ट्यातील डोंगराळ भागात नावापुरता सर्व्हे होत असल्याची माहिती समोर आली आहे. घरात किती माणसे आहेत, केवळ एवढे विचारून तसे स्टिकर त्यांच्या घरावर लावले जात आहे. म्हणजेच आम्ही सर्व्हे केला आहे, हे भासविण्याचा प्रयत्न या माध्यमातून सुरू आहे. त्यामुळे एखाद्याच्या घरात कोणाला त्रास असेल किंवा ताप असेल तर त्याची माहिती मिळणार कशी? आणि कोरोनाला रोखणार कसे? असे सवाल यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.

Web Title: CoronaVirus News: Hurry to fulfill 'responsibility' when 'family' is not at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.