CoronaVirus News: काेराेनाचा कहर झाल्याने ‘रेमडेसिवीर’ची वाढली मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 12:40 AM2021-04-05T00:40:56+5:302021-04-05T00:41:10+5:30

इंजेक्शनच्या टंचाईची धास्ती : किमतीतील फरकांमुळे रुग्ण चिंतेत

CoronaVirus News: Increased demand for 'RemadeVisor' | CoronaVirus News: काेराेनाचा कहर झाल्याने ‘रेमडेसिवीर’ची वाढली मागणी

CoronaVirus News: काेराेनाचा कहर झाल्याने ‘रेमडेसिवीर’ची वाढली मागणी

Next

कल्याण : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालये उपचार घेणाऱ्या रुग्णांनी पूर्णत: भरली गेली आहेत. दुसरीकडे, कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणीही वाढली असताना किमतीतील फरकांमुळे रुग्णांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

महापालिका हद्दीत हजारांहून अधिक कोरोना रुग्ण दररोज आढळून येत आहेत. सध्या साडेनऊ हजारांहून अधिक रुग्ण मनपासह शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. काही रुग्णांमध्ये सौम्य स्वरूपाची लक्षणे आढळून येत असली तरी फुप्फुसांत संसर्ग झालेल्या रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शनचा कोर्स दिला जात आहे. संबंधित रुग्णाला या कोर्समध्ये दिवसाला एक अशी सहा इंजेक्शन दिली जातात. रेमडेसिवीर हे इंजेक्शन कोरोना रुग्णासाठी प्रभावी ठरत असले तरी या इंजेक्शनची उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे दर वेगवेगळे आहेत. 

या इंजेक्शनची एमआरपी किंमत साडेचार हजार रुपयांच्या आसपास आहे. पण, सरकारी नियमानुसार केडीएमसीच्या रुग्णालयांत हे इंजेक्शन प्रती १२०० रुपयांप्रमाणे उपलब्ध होत आहेत तर काही खासगी रुग्णालयांमध्ये हे इंजेक्शन प्रति पाच ते साडेपाच हजारांपर्यंत मिळत असल्याने हे इंजेक्शन खर्चिक पडते. सरकारी नियमानुसार हा कोर्स १३ हजारांमध्ये होणे अपेक्षित असताना खासगी उपचारपद्धतीत त्यासाठी ३० ते ३५ हजार रुपये मोजावे लागत आहेत. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावात कुटुंबे बाधित होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. मनपाची रुग्णालये रुग्णवाढीमुळे भरली असल्याने त्या ठिकाणी सर्वसामान्यांनाही बेड मिळणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे संबंधित रुग्णांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. 

एकाच कुटुंबातील दोन ते तीन जण उपचार घेत असल्याने रेमडेसिवीर इंजेक्शनचा खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न त्यांना पडला आहे. 
सध्या या इंजेक्शनची मागणी वाढल्याने किमती सरकारी नियमानुसार आकारण्यात याव्यात, अशी मागणी रुग्ण आणि त्यांचे नातेवाइक करत आहेत.

पुरवठा वाढविण्यावर भर
मध्यंतरी कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी ही काही प्रमाणात घटली होती. त्यामुळे काही रुग्णालयांनी पुरवठा करण्यावर देखील भर दिला नव्हता; परंतु अचानक रुग्ण संख्या वाढल्याने आणि रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणीही वाढल्याने आता पुरवठा वाढविण्यावर भर देण्यात आला असून त्यामुळे भविष्यात इंजेक्शनचा तुटवडा भासणार नाही, असे जाणकारांचे मत आहे.
 

Web Title: CoronaVirus News: Increased demand for 'RemadeVisor'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.