CoronaVirus News: ठाणे जिल्ह्यातील ९९० माध्यमिक शाळांचे वर्ग भरवणे अशक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 12:52 AM2020-06-14T00:52:16+5:302020-06-14T00:52:24+5:30
कोरोनाची भीती कायम; ६२६ शाळाच ऑनलाइन सुरू करता येणार, चाचपणी झाली पूर्ण
- सुरेश लोखंडे
ठाणे : शाळा सुरू करण्याच्या मुद्द्यावरून केंद्र, राज्य शासन आणि शिक्षक संघटनांमध्ये मतभेद दिसत आहेत. तरीही, शासनाचा आदेश मिळताच शाळा सुरू करणे शक्य व्हावे म्हणून जिल्ह्यातील सक्षम शाळांची चाचपणी जवळपास पूर्ण झाली आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील एक हजार ६१६ माध्यमिक शाळांपैकी केवळ ६२६ शाळांमध्ये पूर्णवेळ, अर्धवेळ आणि दिवसाआड वर्ग भरवता येणे शक्य आहे. तर, उर्वरित ९९० माध्यमिक शाळा कोरोनाच्या भीतीमुळे बंदच राहणार असल्याचे उघड झाले आहे.
राज्य शासन १५ जून, तर केंद्र सरकार आॅगस्टपासून शाळा सुरू करण्याच्या तयारीत आहे. त्यास शिक्षक संघटना, लोकप्रतिनिधींचा विरोध दिसत आहे. माध्यमिक शिक्षण विभागाने केलेल्या चाचपणीत ९९० शाळा या शहरात व कोरोनाच्या कंटेनमेंट झोनमध्ये आहेत. त्यामुळे त्या सुरू करण्याचे नियोजन नसल्याचे निदर्शनात आले आहे. याला शिक्षण विभागानेही दुजोरा दिला आहे. जिल्ह्यात सध्या सव्वाआठ लाख विद्यार्थी पाचवी ते दहावीच्या वर्गात माध्यमिक शिक्षण घेत आहेत. जिल्ह्याच्या भिवंडी, शहापूर व मुरबाड या ग्रामीण भागामधील ३७ शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करता येणार आहेत. तर ४५ शाळा या अर्धवेळ भरवता येतील आणि दिवसाआड एक वर्ग भरवता येईल, असे ८२ शाळांमध्ये नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय, ४६२ शाळांमध्ये प्रत्यक्ष वर्ग न भरवता कधी शाळा तर कधी आॅनलाइन पद्धतीने त्यात विद्यार्थ्यांना शिकवता येईल, असे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे. त्यासाठी शासन निर्णयाची प्रतीक्षा करण्यात येत आहे.
अनेक शिक्षक कोविडच्या कामात
जिल्ह्यातील पाच शाळा क्वारंटाइन कक्षासाठी वापरल्या जात आहेत. या पाच शाळांसह उर्वरित ९८५ शाळा सुरू करण्याचे नियोजन माध्यमिक शिक्षण विभागाकडे नसल्याचे उघड झाले आहे. जिल्ह्यातील २३ हजार शिक्षक सव्वाआठ लाख विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. या शिक्षकांपैकी शाळेच्या जवळपास राहणाऱ्या एक हजार शिक्षकांचा समावेश आहे. तर, ११२ शिक्षक कोविड - १९ चे काम करत आहेत. त्यामुळे अनेक शाळा सुरू करण्याबाबत नियोजन नसल्याचे उघड झाले आहे.