CoronaVirus News: कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह 353 पदांची होणार जम्बो भरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 12:13 AM2021-04-10T00:13:23+5:302021-04-10T00:13:33+5:30
उल्हासनगर पालिका : आरोग्य सेवेवर ताण येऊ नये हा उद्देश
- सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरात कोरोना रुग्णांची उपचारादरम्यान हेडसांड होऊ नये, यापार्श्वभूमीवर महापालिकेने डॉक्टरसह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बोभरती सुरू केली आहे. यात डॉक्टरांची ४५, परिचारिका २६६, वॉर्डबॉय ३१ यांच्यासह अन्य पदे ३५३ भरण्यात येत असल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली.
उल्हासनगर महापालिकेकडे स्वतःचे रुग्णालय नसल्याने महापालिका आरोग्य सुविधेबाबत राज्य शासनाच्या मध्यवर्ती रुग्णालयावर अवलंबून होते. मात्र. कोरोना महामारीत रुग्णांना उत्तम आरोग्य सुविधा मिळण्यासाठी महापालिकेने खासगी साई प्लॅटिनम रुग्णालय दरमहा २० लाख रुपये भाडेतत्त्वावर घेतले.
दरम्यान, कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून आयुक्त डॉ. राजा दयानिधी, अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, उपायुक्त अशोक नाईकवाडी, मदन सोंडे, वैद्यकीय अधिकारी दीपक पगारे, डॉ. राजा रिजवानी, डॉ. अनिता सपकाळे आदींनी डॉक्टरसह अन्य पदे तात्पुरत्या स्वरूपात भरतीचा करण्याचा निर्णय घेतला. वाढत्या रुग्णांना आरोग्य सुविधा देण्यासाठी महापालिका शाळा इमारतीमध्ये आरोग्य सुविधा केंद्र सुरू करण्याचे संकेत दिले.
महापालिका कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी व नागरिकांना आरोग्य सुविधा देण्यासाठी फिजिशियन डॉक्टरची १०, भूलतज्ज्ञ डॉक्टरची १०, वैद्यकीय अधिकाऱ्यांची २५, परिचरिकेची २६६, प्रयोगशाळा तज्ज्ञ ६, औषधनिर्माता ६, वॉर्डबॉयची ३१ असे एकूण ३५३ पदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्यात येत आहे.
गेल्यावर्षी महापालिकेने डॉक्टरसह अन्य पदे तात्पुरत्या स्वरूपात भरती केले होते. दरम्यानच्या काळात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने अनेक डॉक्टरसह अन्य कर्मचारी महापालिका नोकरी सोडून गेले.
त्यामुळे डॉक्टरसह अन्य पदे भरण्याची वेळ महापालिकेवर आली. दरम्यान, कोरोना रुग्णाची संख्या वाढल्याने डॉक्टरसह ३५३ पदे भरती करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरसह अन्य पदाची भरती केल्यास रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा देता येईल, अशी प्रतिक्रिया उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. या भरतीमुळे आरोग्य सेवेवरचा ताण कमी होईल असे सांगण्यात आले.
भरतीला डॉक्टरांचा प्रतिसाद
महापालिकेने डॉक्टरसह अन्य पदांची भरती सुरू केली असून, या भरतीला डॉक्टरांनी चांगला प्रतिसाद दिला तर परिचारिकांसह अन्य पदांची भरती सोमवार ते शुक्रवारदरम्यान होणार आहे.