CoronaVirus News : "नाशिक से गाडी जा रही है"; 'या' अफवांमुळे कसारा घाट जाम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 03:36 PM2020-05-10T15:36:17+5:302020-05-10T15:36:51+5:30
उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशला जाण्यासाठी नाशिकहून रेल्वे व बस सेवा सुरू आहे, तुम्ही घरं रिकामी करून लगेच नाशिकला जा, असं सांगितलं जात आहे.
शाम धुमाळ
कसारा : दोन दिवसापासून कसारा घाट उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशकडे जाणाऱ्या वाहनांसह पायी चालणाऱ्या मजुरांमुळे जाम होत आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, कल्याण परिसरात काही सरकार विरोधी लोकांनी गावी जाण्यासाठी गाड्या सुटत असल्याची एक अफवा पसरवली आहे. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशला जाण्यासाठी नाशिकहून रेल्वे व बस सेवा सुरू आहे, तुम्ही घरं रिकामी करून लगेच नाशिकला जा, असं सांगितलं जात आहे. या दिलासादायक अफवेमुळे परप्रांतीय मजुरांना आपल्या गावी जाण्यासाठी एक आशेचा किरण दिसू लागल्याने हजारो मजूर टेम्पो, ट्रक, सायकल, रिक्षा या वाहनांनी नाशिककडे जात आहेत. त्यामुळेच कसारा घाटात मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ दिसत आहे.
नाशिक जिल्ह्यातून मार्गस्थ होणा-या या मंडळींची कुठल्याहीप्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी विविध सामाजिक संघटनांनी मदतीचा हात पुढे केला आहे. इगतपुरीपासून तर थेट चांदवडपर्यंत ठिकठिकाणी मुंबई-आग्रा महामार्गावर या मजुरांना भोजन, पाणी पुरविले जात आहेत. सरकारने सुध्दा आता प्रवास करण्याची मुभा दिली आहे. तसेच राज्य सरकारनेही या मजुरांना त्यांच्या गावांपर्यंतचा प्रवास सुखकर करण्यासाठी राज्याच्या वेशीपर्र्यंत थेट ‘लालपरी’ मोफत उपलब्ध केली आहे; मात्र तरीदेखील मजूरांची पायपीट सुरूच आहे. तसेच मिळेल त्या वाहनाने हे मजूर प्रवसाला लागले आहेत. दरम्यान, परस्परांमधील ‘डिस्टन्स’बाबतदेखील उदासिनता मजुरांमध्ये दिसून येत आहे. काही लोक मास्क बांधत आहेत, तर काही मात्र याकडे दुर्लक्ष करत आहेत.