CoronaVirus News : ठामपाने ५०पेक्षा जास्त मृत्यू लपविले, किरीट सोमय्या यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 01:15 AM2020-06-24T01:15:53+5:302020-06-24T07:19:36+5:30

कोविडने मृत्यू झालेल्या ५० पेक्षा अधिक मृतांचा आकडा लपविला असल्याचा गंभीर आरोप मंगळवारी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला.

CoronaVirus News : Kirit Somaiya alleges that Thampa hid more than 50 deaths | CoronaVirus News : ठामपाने ५०पेक्षा जास्त मृत्यू लपविले, किरीट सोमय्या यांचा आरोप

CoronaVirus News : ठामपाने ५०पेक्षा जास्त मृत्यू लपविले, किरीट सोमय्या यांचा आरोप

Next

ठाणे : राज्यात ठाकरे सरकारने जो कोविड मृतांचा आकडा लपविण्याचा प्रयत्न केला आहे, तोच गोंधळ ठाणे महापालिकेतदेखील सुरू आहे. येथे कोविडने मृत्यू झालेल्या ५० पेक्षा अधिक मृतांचा आकडा लपविला असल्याचा गंभीर आरोप मंगळवारी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला.
राज्य सरकारला पाठविलेल्या रिपोर्टमध्ये या आकडेवारीचा समावेश केलेला नसल्याचे सांगून मुंब्रा परिसरात जेवढे मृत्यू झाले आहेत, त्याच्या निम्मेच मृत्यू दाखविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाला हरवले हे केवळ भासविण्यासाठी इथल्या राजकीय मंडळींकडून असे प्रकार सुरू असल्याचे सांगून त्यांनी राजकीय मंडळींवरदेखील टीका केली.
सोमय्यांसह आमदार निरंजन डावखरे तसेच ठाण्यातील पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी ठाण्यातील कोविडची परिस्थिती जाणून घेण्यासाठी महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी भेट घेतली. या बैठकीत त्यांनी कोरोनाने मृत्यू झालेल्यांची माहिती मागविली असून त्यावर आपण समाधानी नसल्याचे सांगितले. ठाकरे सरकारने ३ हजार मृत्यू दडपले आहेत. ९ हजार मृत्यू झाल्याची आम्हाला खात्री आहे. तर १,५०० मृत्यू कमी दाखविले गेले आहेत ही कबुलीदेखील राज्य सरकारने दिली आहे. सोमवारी सोलापूर महापालिकेने ४० मृत्यू दडपण्याचादेखील प्रयत्न केला आहे. त्यामुळे राज्यात लोकांना खूप नुकसान होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात जे मृत्यूचे आकडे लपविले आहेत त्यातील २ हजार मृत्यू हे मुंबईत दडपले असून ठाणे महापालिकेने ५० च्या वर कोविड मृत्यू दडपले आहेत, असा आरोप त्यांनी या वेळी केला.
>खासगी रुग्णालयांकडून लूट : ठाण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये जाणूनबुजून रु ग्णांना पाठविण्यात येत असून त्यामुळेच त्यांच्याकडून भरमसाट फी वसूल केली जात आहे. हा सर्व प्रकारदेखील थांबला पाहिजे. दुसरीकडे जोगेश्वरी ट्रॉमा सेंटर, उल्हासनगर, भिवंडी या ठिकाणी आॅक्सिजन यंत्रणेत बिघाड झाल्याने मृत्यू झाले आहेत. ठाणे महापालिकेतसुद्धा अशा त्रुटी आहेत, त्यामुळे आॅक्सिजन, तांत्रिक त्रुटींमुळे मृत्यू होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. कोविड रु ग्णांच्या अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत जागा कमी पडत असून, ती सुविधादेखील राज्य सरकारने केली नसल्याचे त्यांनी सांगितले. ठाण्यात आयुक्तांबरोबर झालेल्या चर्चेत जे मुद्दे उपस्थित केले त्यावर लक्ष देण्याचे आश्वासन दिले असले तरी आपण असमाधानी असल्याचे ते म्हणाले.
>मुंब्य्रातील निम्मेच मृत्यू दाखविले
ठाणे महापालिकेच्या कारभारावर टीका करताना सोमय्या यांनी विशेष करून मुंब्य्रात जे मृत्यू झाले आहेत त्याची आकडेवारी लपविली असल्याचे सांगितले. मुंब्य्रात जे मृत्यू झाले आहेत, त्यांतील निम्मेच मृत्यू दाखविले असून याची चौकशी करण्याची मागणीदेखील त्यांनी केली. मुंब्य्राची आकडेवारी ठाणे महापालिकेच्या आकडेवारीत नसल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: CoronaVirus News : Kirit Somaiya alleges that Thampa hid more than 50 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.