CoronaVirus News: कोरोना महामारीत लिंबू, संत्री, मोसंबीचा राेगप्रतिकारकशक्तीचा उतारा महागला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 12:02 AM2021-04-07T00:02:24+5:302021-04-07T00:02:48+5:30

वाढत्या मागणीमुळे दर वाढले : ‘क’ जीवनसत्त्व ठरते शरीराला पाेषक

CoronaVirus News: Lemons, oranges, sweet oranges cost more in Corona epidemic | CoronaVirus News: कोरोना महामारीत लिंबू, संत्री, मोसंबीचा राेगप्रतिकारकशक्तीचा उतारा महागला

CoronaVirus News: कोरोना महामारीत लिंबू, संत्री, मोसंबीचा राेगप्रतिकारकशक्तीचा उतारा महागला

Next

- मुरलीधर भवार

कल्याण : कोरोनाकाळात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. मात्र, त्यावर सगळ्य़ात महत्त्वाचा उतारा हा लिंबू, संत्री आणि मोसंबीचा मानला जात आहे. त्यामुळे लिंबू, संत्री, मोसंबीला बाजारात जास्त मागणी आहे. यांचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. कारण त्यात क जीवनसत्त्व जास्त आहे. ते शरीराला लाभदायक ठरते. 

कोरोनावर अद्याप ठोस औषध बाजारात उपलब्ध नाही. कोरोनाची लस बाजारात उपलब्ध झाली आहे. मात्र, लसीकरणाची प्रक्रिया अद्याप सगळ्य़ांसाठी सुरू नाही. महापालिकेच्या रुग्णालयातून लसीकरण मोफत केले जात आहे, तर खासगी रुग्णालयात लसीसाठी २५० रुपये मोजावे लागतात. कोरोनाची लस बाजारात येण्यापूर्वी अनेक गोष्टी सुचविल्या जात होत्या. त्यात कोणत्या फळांचे सेवन करावे, असे सांगितले जात होते. ज्याची रोगप्रतिकारशक्ती जास्त त्यांना कोरोनाची लागण लवकर होत नाही. ती झाल्यास रोग प्रतिकारशक्ती चांगली असल्यास रुग्ण कोरोनावर मात करून त्यातून बरा होतो. अनेकांच्या सेवनात क जीवनसत्त्वाचा अभाव असतो. त्यामुळे त्यांच्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती कमी दिसून येते. त्यांची इम्युनिटी पॉवर कमी असते. आहारशास्त्रज्ञांच्या मते रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आहारात समप्रमाणात क जीवनसत्त्व असलेल्या फळांचे नियमित सेवन केल्यास ती वाढते. त्यामुळे आजही सकाळीच व्यायामाला जाणारे लोक ज्यूस सेंटरमध्ये लिंबू सरबत आणि मोसंबी आणि संत्र्यांचा ज्यूस पिण्यास पसंती देताना दिसून येत आहेत. अनेक ज्यूस सेंटरचालकांनी कोरोनाकाळात या तीन ज्यूसला प्राधान्य दिले आहे. 

ग्राहकांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ज्यूस सेंटरचालकांनीही चंग बांधल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या कोरोनाचा कहर वाढत असल्याने मैदानानजीक असलेल्या ज्यूस सेंटरचा ग्राहक कमी झाला आहे. फळांशी संबंधित दुकाने सुरू ठेवण्यास मुभा आहे. त्यामुळे फळांची खरेदी वाढली आहे.

आवक कुठून होते 
संत्री मोसंबीची आवक अमरावती, नागपूर येथून होते, तर लिंबू हा अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातून जास्त प्रमाणातून बाजारात येतो. सध्या कोरोनाकाळात शेतमाल वाहतुकीस मुभा असली तरी माल कमी येत आहे, अशी माहिती कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव श्यामकांत चौधरी यांनी दिली आहे.

तज्ज्ञ काय म्हणतात... 
क जीवनसत्त्वाची फळे सेवन केल्याने शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते, हे खरे आहे. मात्र, त्यांच्या सेवनामुळे कोरोनावर मात करता येईल, याचा दावा करता येत नाही. रोगप्रतिकारशक्ती वाढल्यास कोरोना रोखण्यासाठी ती कदाचित उपयुक्त पडू शकते. शंभर टक्के उपयुक्त पडेल, असा दावा करता येत नाही. मात्र, कोरोना आला म्हणून क जीवनसत्त्वाच्या फळांच्या सेवनाचा अतिरेक करून चालणार नाही. काही प्रमाणातच त्यांचे सेवन केले जावे.
- डॉ. प्रा. उदयकुमार पाध्ये, 
आहारतज्ज्ञ

नियमित क जीवनसत्त्वाचे सेवन करतो. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सेवन करीत आहे. केवळ क जीवनसत्त्वाची फळे खात नाही. त्यासोबत नियमित व्यायामही करतो.
-राजू शेट्टी

२. मला कोरोना झाला होता. त्यावेळी मला डॉक्टरांनी  क जीवनसत्त्व असलेली फळे खाण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे मोसंबी आणि संत्री ही फळे मी खाल्ली. मला लवकर तंदुरुस्त होण्यास त्यामुळे मदत झाली. 
-सोपन वरगडे 

दर का वाढले : कोरोनामुळे लिंबू, मोसंबी आणि संत्री यांचे दर वाढलेले आहेत. बाजारात लिंबू आणि मोसंबी मिळत आहे. मात्र, संत्रीची आवक जास्त नाही. संत्रीची आवक कमी असल्याने त्याच्या दरात वाढ झाली आहे. जवळपास ३० ते ४० टक्के दरवाढ झालेली दिसून येत आहे. 

फळे    जानेवारी    फेब्रुवारी    मार्च    एप्रिल
लिंबू    १०,     १५,     २०,     ४० रुपये.
मोसंबी    ४०,     ४५,     ५०,     ६० रुपये.
संत्री    ८०,     १००,     १२०,     २४० रुपये.

Web Title: CoronaVirus News: Lemons, oranges, sweet oranges cost more in Corona epidemic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.