CoronaVirus News: मुंब्य्रातील जनजीवन आले पूर्वपदावर; कोरोनामुक्तीकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 01:08 AM2020-08-14T01:08:09+5:302020-08-14T01:08:17+5:30
दहशत झाली कमी, दैनंदिन व्यवहार सुरळीत
- कुमार बडदे
मुंब्रा : कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत असलेल्या मुंब्रा शहरातील जनजीवन पूर्वपदावर आले असून येथील दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. शहर कोरोनामुक्त व्हावे, यासाठी प्रशासकीय यंत्रणा, सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी, स्थानिक डॉक्टर यांनी येथे राबविलेल्या संयुक्त योजनांना स्थानिकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे येथील बहुतांश भागांतील बाधितांची संख्या नियंत्रणात आली आहे. चार दिवसांमध्ये येथील तुरळक भागांमध्ये प्रत्येक दिवशी दोन याप्रमाणे फक्त आठ बाधित आढळले आहेत.
येथील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांच्या बाजूला असलेली ज्वेलर्स, किराणा तसेच दूध आणि बेकरी उत्पादने विक्रीची दुकाने याचप्रमाणे सलून समविषम तारखांऐवजी दररोज सुरू आहेत. येथील दळणवळणाचे प्रमुख साधन असलेल्या रिक्षादेखील पहाटेपासून उशिरापर्यंत रस्त्यावर धावत आहेत. फेरीवालेही रस्त्यांच्या दुतर्फा व्यवसाय करत आहेत. बाधितांची संख्या नियंत्रणात आल्याची माहिती स्थानिकांपर्यंत पोहोचत असल्यामुळे त्यांच्या मनातील कोरोनाबाबतची भीती कमी झाल्याने काही दिवसांपूर्वी खरेदीसाठी दबकत बाजारपेठांमध्ये वावरणारे येथील बहुतांश नागरिक सध्या खरेदीसाठी मुक्तपणे वावरताना दिसत आहेत.
रुग्णसंख्या नियंत्रणात आली असली, तरी ती शून्यावर आणून शहर कोरोनामुक्त करण्यासाठी सर्वच स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. येथील बहुतांश भागांमध्ये बाधित आढळत नसल्यामुळे ठामपा अधिकारी नरमाईचे धोरण अवलंबत आहेत.