CoronaVirus News: लोकल धावली, पण डब्यातली मैफल जमलीच नाही...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 12:44 AM2020-06-16T00:44:09+5:302020-06-16T00:44:20+5:30
८० दिवसांनंतर धावली लोकल : भिशीचा ग्रुप नसल्याने हिरमोड
ठाणे : अरे एलआयसीचा जोशी आलाय, त्याला बसायला जागा दे... अंबरनाथच्या कुळकर्ण्या तू आज पेपर नाही का आणलास? तुला कडकी लागली का?... चला रे घाटकोपर आले अंकलला बसायला दे... अंकल को नही बैठने का वो तो अभी जवाँ है... मध्य रेल्वेच्या पुरुषांच्या डब्यातील ग्रुपमध्ये हे आणि असे अनेक कानांवर पडणारे संवाद सोमवारी ८० दिवसांच्या प्रतीक्षेनंतर लोकल सुरु झाली तरी कानांवर पडले नाहीत. कारण, अत्यावश्यक सेवेतील सरकारी कर्मचाऱ्यांकरिताच ही सेवा सुरु झाली. खासगी कर्मचारी या ग्रुपमध्ये नसल्याने ग्रुपची फूल टू धमाल अनुभवास आलीच नाही.
लोकल कल्याणहून सीएसटीला पोहोचेपर्यंत बीएमसीतील वागळे, हेल्थमधील लिमये लोकल सुरु होऊनही बसच्या रांगेत उभे राहिल्याने कसे धक्के खात येताहेत, हा विषय डब्यात चघळायला मिळाला होता. तिकडे लेडिज डब्यातही मैत्रिणींना मिस केल्याने चुटपुटीची भावना व्यक्त होत होती. खासगी कंपनीत काम करणाºया हर्षदा किंवा अनिताला दोन तास रांगेत उभे राहून बस मिळाली नाही, याची चिंता व्यक्त होत होती. लॉकडाऊनच्या काळातील रेसिपी, न केलेले शॉपिंग अशा गप्पा आणि हास्याची किणकिण डब्यात कानांवर पडली. भिशी कधी सुरु करायची, याची चर्चा करीत सुरु झालेला हा प्रवास भिशी सुरु करण्याच्या निर्धाराने संपला. लोकल सुरु झाल्याने सुखकारक ठरलेला प्रवास ग्रुप जमला नाही, याची खंत मनात ठेवणारा होता.
किती लोकल धावल्या आणि कशा...
डोंबिवली : अर्ध्या तासाच्या फरकाने सकाळच्या सत्रात सोमवारी दुपारी १२ वाजेपर्यंत मुंबईच्या दिशेने १४ लोकल धावल्या. तेवढ्याच लोकल डाउन मार्गावरदेखील धावल्या. दुपारच्या सत्रातही १२ नंतर संध्याकाळी ५ वाजेपर्यंत २० लोकल अप, डाउन मार्गावर धावल्या. डोंबिवलीमध्ये पूर्वेला रामनगर आणि पश्चिमेला कल्याण एण्डला विष्णूनगर तिकीट खिडकीजवळ प्रवाशांच्या रांगा लागलेल्या दिसत होत्या.
दोन्ही दिशांकडील प्रवाशांना स्थानकात येताना मधल्या पादचारी पुलावरूनच प्रवेश करण्याची सक्ती करण्यात आली होती. त्यामुळे तेथे जाताना आरपीएफ, जीआरपी पोलिसांमार्फत ओळखपत्र व तिकीट बघण्यात येत होते. त्यानंतरच फलाट क्रमांक ३ वर मुंबईला जाण्यासाठी व कल्याणकडे जाण्यासाठी फलाट क्रमांक ४ वर प्रवेश दिला जात होता. महत्त्वाचे म्हणजे, लोकल स्वच्छ होत्या, पंखे, लाईट सुरु होते.
रेल्वेस्थानकातील स्वच्छतागृह, तिकीटघर ही सुविधा सुरु होती. कोणत्याही स्थानकात कॅन्टीन सेवा उपलब्ध नव्हती. बहुतांश स्थानकांतील स्वयंचलित जिने बंद होते. अडीच महिने बंद असलेल्या स्थानकामध्ये धूळ पसरलेली होती. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरु केली आहे. गर्दी नसल्याने पहिल्या दिवशी सुटसुटीत प्रवास झाल्याचे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी सांगितले.
मी सरकारी रुग्णालयात कर्मचारी आहे. रेल्वे सुरु केल्याने लवकर पोहोचणे शक्य होईल, असे कल्याणचे प्रभाकर जाधव यांनी सांगितले. खासगी कर्मचाºयांनाही ही सुविधा मिळाल्यास त्यांची अडचण कमी होईल, असे उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेचे म्हणणे आहे. गाडीत गर्दी होणार नाही, याकडे लक्ष देण्याची अपेक्षा डोंबिवलीच्या मनीषा म्हात्रे यांनी व्यक्त केली.
खाजगी कर्मचाºयांच्या नशिबी मुंबई गाठण्यासाठी हालअपेष्टा सुरुच आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांसाठी कल्याण स्थानकातून सोमवारी पहाटे ५.३९ वा. पहिली गाडी सोडण्यात आली. ८४ दिवसांनंतर प्रवास केल्याबद्दल काही प्रवाशांनी आनंद व्यक्त केला. मात्र, सहप्रवासी नसल्याची खंत व्यक्त केली. आ. राजू पाटील यांनी महिला प्रवाशांकरिता विशेष लोकल सुरू करण्याची मागणी केली आहे.