CoronaVirus News: डोंबिवलीत अनलॉकमध्येही होतेय लॉकडाऊनची सक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 12:19 AM2020-06-16T00:19:52+5:302020-06-16T00:20:10+5:30
मोठ्या गृहसंकुलांकडून सरकारी नियमांचा विपर्यास : पदाधिकाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे रहिवाशांच्या वावरावर निर्बंध; कामावर जाणेही बनले अवघड
डोंबिवली : एखाद्या ठिकाणी कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर आजूबाजूचा १०० मीटरचा परिसर सील करण्यासंदर्भातील केडीएमसीच्या नियमाचा अनेक मोठी गृहसंकुले आपापल्या परीने अर्थ लावून आपल्या संकुलातील रहिवाशांच्या वावरावर निर्बंध आणत असल्याच्या तक्रारी येत आहेत. असाच एक प्रकार दावडी परिसरातील एका नामांकीत गृहसंकुलात घडला असून, एका मोठ्या टॉवरमध्ये रुग्ण सापडल्याने आजूबाजूचे टॉवरही सील करून रहिवाशांना बाहेर पडण्यास आणि बाहेरील नागरिकांना येण्यास मज्जाव केला जात आहे.
सध्या अनलॉक १ मुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, प्रारंभीच्या काळात जेथे रुग्ण आढळत असत तेथील ५०० मीटरचा परिसर सील केला जात होता. परंतु, नवीन नियमाप्रमाणे १०० मीटरचाच परिसर सील केला जात आहे. परंतु, या नियमांचे उल्लंघन काही गृहसंकुलांमध्ये होताना दिसत आहे. यात नियमांचे पालन करण्याकडे यंत्रणांचेही दुर्लक्ष झाले आहे.
दावडीतील एका मोठ्या गृहसंकुलातील ११ नंबरच्या टॉवरमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळल्याने १०० मीटरचा परिसर सील करणे अपेक्षित असताना आजूबाजूचे तीन टॉवरही सील केले आहे. त्यामुळे रहिवाशांची गैरसोय होत आहे. लॉकडाऊनमध्ये ठप्प पडलेली कामे अनलॉकच्या निमित्ताने सुरू झाली होती. काही ठिकाणी दुरुस्ती तर, काही घरांमध्ये रंगरंगोटी सुरू होती. त्यासाठी बाहेरचे कामगार टॉवरमध्ये येत होते. परंतु, त्यांनाही निर्बंध घालण्यात आले आहेत. अनलॉकमध्ये कर्मचाऱ्यांना आता कामावर येण्याची सक्ती केली जात आहे. परंतु, गृहसंकुलातील पदाधिकाºयांच्या आडमुठे धोरणामुळे त्या कर्मचाºयांचेही हाल होत आहेत.
‘योग्य कार्यवाही करू’
या संदर्भात केडीएमसीचे ‘ई’ प्रभागक्षेत्र अतिरिक्त प्रभाग अधिकारी अक्षय गुडधे यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता या प्रभागाचा अतिरिक्त कार्यभार नुकताच माझ्याकडे आला आहे. संबंधित ठिकाणाची माहिती घेऊन योग्य कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
ठाणे महापालिकेच्या अधिकाºयाला कोरोनाची लागण
मुंब्रा : ठाणे महापालिकेच्या मुंब्रा प्रभाग समितीमध्ये कार्यरत असलेल्या एका अधिकाºयाला कोरोनाची लागण झाल्याचे सोमवारी उघडकीस आले. उपचारासाठी त्याना मुंबईतील खाजगी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाºयाने दिली. संबंधित अधिकारी अनेक दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेल्या परिसरात निर्र्भीडपणे कर्तव्य बजावत होता. कोरोनाबाधितांसाठी सुरु केलेल्या विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी पुढाकार घेतला होता.
कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत सोमवारी कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ६२ झाली आहे. तर, दुसरीकडे नव्याने १३१ रुग्ण आढळल्याने एकूण बाधितांची संख्या दोन हजार ३०३ झाली आहे. कोरोनाचा उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या एक हजार १८५ असून, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार ३३ आहे.
कोरोनाचे नवे २७ रुग्ण
उल्हासनगर : शहरात सोमवारी २७ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. शहरातील कॅम्प नं. १ मध्ये ४, कॅम्प नं. २ मध्ये १, कॅम्प नं. ३ मध्ये १२, कॅम्प नं. ४ मध्ये ८, तर कॅम्प नं. ५ मध्ये २ रुग्ण आढळले असल्याची माहिती मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास मोहनालकर यांनी दिली. शहरातील एकूण रुग्णसंख्या ७८६ झाली आहे. आतापर्यंत यातील २७ जणांचा मृत्यू झाला आहे. मनपा खाजगी संस्थेचे साई प्लॅटेनियम रुग्णालयाचे रूपांतर कोरोना रुग्णालयात करणार आहे.
भिवंडीत उपचारांअभावी इतर आजारांच्या रुग्णांची परवड
भिवंडी : शहरात कोरोना रु ग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र, कोरोनाच्या रुग्णांमुळे शहरात इतर आजारांच्या रु ग्णांची हेळसांड सुरू झाली आहे. इतर आजाराच्या रु ग्णांवर उपचार करण्यास खासगी रुग्णालयातील डॉक्टर नकार देत असल्याने रुग्णांना जीव गमवावा लागत आहे.
दोन दिवसांपूर्वी पहाटे हृदयविकाराचा झटका आलेल्या नीलेश लदगे यास रुग्णालयात उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. नीलेश याची प्रकृती अचानक बिघडल्यानंतर त्यास रिक्षातून शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये फिरविले; मात्र कोणीही दाखल करून घेतले नाही. त्यामुळे नीलेशची प्राणज्योत मालवली, असे त्याचे भाऊ अॅड. अभय लदगे यांनी सांगितले. या भयानक परिस्थितीत आरोग्यव्यवस्था जिवंत आहे की मृत झाली आहे, असा प्रश्नही त्यांनी केला आहे.