Coronavirus News: ठाण्यात हॉटस्पॉट क्षेत्रात लॉकडाऊन कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 01:02 IST2020-07-19T01:01:45+5:302020-07-19T01:02:12+5:30
मॉल्स, मार्केट आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स वगळून सर्वप्रकारच्या बाजारपेठा, भाजी मार्केट आणि दुकानांना सम -विषम तारखेनुसार ठेवता येणार आहेत.

Coronavirus News: ठाण्यात हॉटस्पॉट क्षेत्रात लॉकडाऊन कायम
ठाणे : महापालिका क्षेत्रात १९ जुलैपर्यंत लागू असलेल्या लॉकडाऊनला मुदतवाढ देण्यात आलेली नाही. पण ठाण्यातील हॉटस्पॉट क्षेत्रात हा लॉकडाऊन ३१ जुलैपर्यंत कायम असणार आहे. याबाबतचा आदेश महापालिका प्रशासनाच्यावतीने शनिवारी काढण्यात आला आहे.
राजकीय पक्ष, व्यापारी संघटना आणि नागरिकांच्या प्रचंड विरोधानंतर अखेर ठाणे महापालिका क्षेत्रात लॉकडाऊन मुदत वाढ देण्यात आली नसून पालिका प्रशासनाच्या वतीने अनलॉक जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे तब्बल १८ दिवसांपासून थांबलेले अर्थचक्र पुन्हा सुरू होणार आहे.
महापालिकेने काढलेल्या आदेशानुसार मॉल्स, मार्केट आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स वगळून सर्वप्रकारच्या बाजारपेठा, भाजी मार्केट आणि दुकानांना सम -विषम तारखेनुसार ठेवता येणार आहेत. पण शहरात कोरोनाच्या संक्रमणाबाबत शहरात २७ ठिकाणे हॉटस्पॉट ठरली आहेत. या क्षेत्रात ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे ठाणे महापालिका प्रशासनाच्या वतीने काढण्यात आलेल्या अध्यादेशामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.