CoronaVirus News: लॉकडाऊनमध्ये 'त्याला' पारंपरिक व्यवसायाने दिला जगण्याचा आधार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 12:24 PM2020-05-11T12:24:10+5:302020-05-11T13:19:35+5:30
अडचणीच्या काळात अखेर पारंपरिक व्यवसायानेच आधार दिल्याने भविष्यात तोच पुढे सुरू ठेवणार असल्याचा निश्चय त्याने बोलून दाखवला.
धीरज परब
मीरा रोड - कोरोनाच्या महामारीमध्ये रोजगार, व्यवसाय ठप्प झाल्याने लोकांची आर्थिक स्थिती बिघडली आहे. परंतु कोरोनाच्या संकटकाळात पारंपरिक व्यवसायाने मात्र जगण्याचा आधार दिला. मासेविक्रीचा पारंपरिक व्यवसाय सोडून गेली 10 वर्ष इस्टेट एजन्ट म्हणून व्यवसाय करणा-या भाईंदरच्या गोडदेव गावातील हेमंत लक्ष्मण पाटील हा कोळी तरुण पुन्हा आपल्या पारंपरिक व्यवसायाकडे वळला आहे. अडचणीच्या काळात अखेर पारंपरिक व्यवसायानेच आधार दिल्याने भविष्यात तोच पुढे सुरू ठेवणार असल्याचा निश्चय त्याने बोलून दाखवला.
शेती, मासेमारी, मीठ पिकवणे हा मीरा-भाईंदरमधील स्थानिकांचा पारंपरिक व्यवसाय आहे. परंतु जमिनीचे भाव आणि बांधकाम आदी व्यवसायाच्या तेजीमुळे बहुतांशी लोकांनी जमिनी विकून टाकल्या. पारंपरिक व्यवसाय बहुतांश तरुणांना देखील अंगमेहनतीमुळे नकोसा वाटू लागला. कमीपणाचा वाटू लागला. मासेमारी मच्छीमार करत असले तरी मासेविक्रीचा बाजार परप्रांतीयांनी ताब्यात घेतला. शेतजमिनी, बागायतीदेखील अन्य लोकांनी विकत घेतल्या. त्यात बांधकामे वा फार्म केले गेले. मिठागरे देखील बंद पडली व धनदांडग्यांनी घेतली. गावातल्या गावक-यांच्या जमिनी विकून देणारे दलालसुद्धा गावातलेच उभे राहिले.
भाईंदरच्या गोडदेव गावात राहणा-या हेमंत पाटील या कोळी समाजातील तरुणाचा मूळ पारंपरिक व्यवसाय तसा शेती, मासेमारी व मासे विक्री आहे. पण शेती-मासेमारी राहिली नसली तरी हेमंतची आई रुक्मिणी गोडदेव बाजारात मासेविक्रीचा आपला पारंपरिक व्यवसाय करत होती. हेमंतची पत्नी अश्विनीने देखील आपल्या सासूच्या पारंपरिक मासेमारीचा व्यवसायात हात दिला. हेमंतने मात्र 10 वर्षांपूर्वीच आपल्या पारंपरिक व्यवसायाकडे पाठ फिरवत झटपट पैसे मिळतील म्हणून इस्टेट एजन्सीचा व्यवसाय सुरू केला.
कोरोनासारख्या अतिसूक्ष्म विषाणूने मात्र सर्व जगालाच ठप्प केले. रोजगार, नोक-या बंद पडल्याने एकवेळचे खायचेसुद्धा वांदे झाले. अशा आर्थिक अडचणीच्या काळात शेती, मासेमारी यांसारख्या पारंपरिक व्यवसायाने मात्र लोकांना आधार दिला. स्थानिक नगरसेविका तारा घरत यांनी हेमंतला पारंपरिक मासेविक्रीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी थेट उत्तनच्या मच्छिमारांशी संपर्क साधून दिलाच, पण त्याला मासे खरेदीसाठी आर्थिक मदत केली. मच्छीमारांना देखील घाऊक मासे खरेदी करणारे हवेच होते. कारण पकडून आणलेले मासे विकण्याचा मोठा प्रश्न त्यांच्या समोर होता.
हेमंतने पारंपरिक मासेविक्रीच्या व्यवसायात स्वत:ला झोकून दिले. मच्छीमारांकडून थेट मासे खरेदी त्याने सुरू केली. त्यासाठी या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव व पारख असलेली त्याची आई त्याला मदत करतेय. तो स्वत: आईला घेऊन मासे खरेदीसाठी मच्छिमारांकडे जातोय. कोरोनामुळे तो मासे आता बाजारात नव्हे तर घरपोच विकत आहे. कोरोनामुळे बाजारात बसून मासेविक्रीचा व्यवसाय बदलला आहे. ताजे मासे आपल्या ग्राहकांना घरपोच देण्याचा त्याचा हा व्यवसाय ब-यापैकी वाढला आहे. ग्राहकांकडूनच त्याला नवनवे ग्राहक मिळत आहेत. शहरातूनच नव्हे तर मुंबई - ठाण्यातून देखील त्याला ऑर्डर येऊ लागल्या आहेत. लोकांना वेळीच डिलिव्हरी देणे आवश्यक असल्याने त्याची आई, पत्नी , मुलगा आदी सर्व कुटुंबच त्याला मदत करत आहे.
कोरोनाच्या संकटकाळात हेमंतला त्याच्या पारंपरिक व्यवसायाने आधार दिला. तोदेखील कुठला कमीपणा न बाळगता मोठ्या उत्साहाने त्यात उतरला आहे. लोकांचा वाढता प्रतिसाद पाहून त्याने आता भविष्यात देखील आपण आपला पारंपरिक व्यवसायाच करणार आहोत, असा निर्धार त्याने बोलून दाखवला.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News :आम्ही उद्ध्वस्त झालोय, मदत करा; इम्रान खान यांच्या अर्थ सल्लागाराची कबुली
Lockdown News: "शहरातील 'त्यांना' बाहेरचे समजतात अन् गावात कोरोनाच्या भीतीनं प्रवेश मिळत नाही"
"आताचं संकट मोदींना झेपणारं नाही; त्यांनी सर्वपक्षीय सरकार स्थापन करावं"
Lockdown News: आजपासून ५ दिवसांसाठी मोदी सरकारची योजना; घरबसल्या करा स्वस्तात सोनं खरेदी!