CoronaVirus News : लॉकडाऊनचा अद्याप विचार नाही, आयुक्तांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 12:22 AM2020-06-23T00:22:34+5:302020-06-23T00:22:47+5:30
CoronaVirus News : यासंदर्भात आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे विचारणा केली असता अद्याप तरी लॉकडाऊन करण्यासंदर्भात विचार नाही, असे स्पष्ट केले आहे.
कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील कोरोना रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी पुन्हा १५ दिवसांचा कडक लॉकडाऊन घ्या, अशी मागणी पालकमंत्र्यांसोबत पार पडलेल्या बैठकीत आमदारांनी केली होती. हा निर्णय आयुक्त घेतील, असा अंगुलीनिर्देश केला होता. यासंदर्भात आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे विचारणा केली असता अद्याप तरी लॉकडाऊन करण्यासंदर्भात विचार नाही, असे स्पष्ट केले आहे.
२४ मार्चपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन होता. कल्याण-डोंबिवलीत लॉकडाऊनची अंमलबजावणी काटेकोर करणे हे काम पोलीस प्रशासन, महापालिका प्रशासनाचे होते. तीन महिन्यांत काटेकोर पालन न झाल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या तीन हजार २०० पेक्षा जास्त झाली आहे. चार दिवसांत ९०० रुग्ण वाढले. लॉकडाऊन संपल्यावर अनलॉक-१ सुरू झाले. मात्र, कोरोना रुग्ण वाढत असल्याने ते रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊनची मागणी आमदारांनी पालकमंत्र्यांकडे केली. लॉकडाऊनच्या तीन महिन्यांत शक्य झाले नाही, ते १५ दिवसांत काय शक्य होणार? १५ दिवसांत संपूर्ण आरोग्य यंत्रणा पुढील वाढणाऱ्या रुग्णांसाठी पुरी पडू शकते का, असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
नागरिकांच्या मनातील भावनेला ‘लोकमत’च्या हॅलो ठाणे पुरवणीत स्थान मिळाले. ‘खबरदार लॉकडाऊन कराल तर’ या ठळक मथळ्याखाली प्रसिद्ध झालेली बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली. अनेकांनी याविषयी जोरदार चर्चा केली. लोकमत नेहमीच जनतेच्या बाजूने असल्याचे या बातमीतून पुन्हा स्पष्ट झाले. त्यामुळेच प्रशासनाला विचार करूनच निर्णय घ्यावा लागणार आहे, असे आयुक्तांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे. अनलॉकमध्ये ज्या अटी-शर्ती घालून दिलेल्या आहेत, त्यांचेही काटेकोर पालन झाल्यास लॉकडाऊन करण्याची वेळ येणार नाही.