CoronaVirus News in Mira Bhayandar : मीरा भाईंदरमध्ये गेल्या 10 दिवसांत कोरोनाचे 242 रुग्ण, 9 जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 03:17 PM2020-05-26T15:17:36+5:302020-05-26T15:18:13+5:30
CoronaVirus News in Mira Bhayandar : मीरा भाईंदर महापालिकेच्या हद्दीत 27 मार्च ते 15 मे या 46 दिवसांच्या कालावधीत शहरात 291 कोरोना रुग्ण सापडले तर 8 जणांचा मृत्यू झाला होता.
मीरारोड : मीरा भाईंदरमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. झोपडपट्टी भागात कोरोनाची लागण चिंताजनक बनली आहे. सोमवारपर्यंत 533 रुग्ण व 17 जणांचा मृत्यू झाला. गेल्या 10 दिवसांत कोरोनाचे तब्बल 242 रुग्ण सापडले असून 9 जणांचे बळी गेले आहेत. त्या तुलनेत आधीच्या 46 दिवसांमध्ये 291 कोरोना रुग्ण सापडले व 8 जणांचा मृत्यू झाला होता.
मीरा भाईंदर महापालिकेच्या हद्दीत 27 मार्च ते 15 मे या 46 दिवसांच्या कालावधीत शहरात 291 कोरोना रुग्ण सापडले तर 8 जणांचा मृत्यू झाला होता. 16 ते 25 मे या गेल्या 10 दिवसांत रोज दोन अंकी कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. या 10 दिवसांत 242 कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. 22 मे रोजी तर विक्रमी 51 इतके रुग्ण सापडले होते. गेल्या 10 दिवसांत मृत्यूचे प्रमाण देखील वाढले असून 9 जणांचा बळी गेला आहे.
25 मेपर्यंत सापडलेल्या 533 कोरोना रुग्णांपैकी मीरारोड मध्ये 284 तर भाईंदर मध्ये 249 इतके कोरोनाचे रुग्ण आहेत. 15 मे पर्यंत 202 कोरोना रुग्ण बरे झाले होते. पण गेल्या 10 दिवसात 116 रुग्ण बरे झालेले आहेत. आतापर्यंत 318 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असले तरी वाढते रुग्ण व त्यातही गणेश देवलनगर, भोलानगर, जय अंबेनगर, इंदिरा कोठार आदी झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचा फैलाव देखील चिंतेचा विषय बनला आहे.
गणेश देवलनगर सह शिवसेना गल्ली व नयानगर कोरोनाचे हॉट स्पॉट बनले आहेत. महापालिकेच्या शासन अखत्यारीतील भिमसेन जोशी रुग्णालया सह अन्य काही खाजगी रुग्णालयात देखील कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. शिवाय लक्षणे न दिसणाऱ्या कोरोना रुग्णांसाठी कोवीड केअर सुरु केले आहे.