CoronaVirus News : कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना खाटा टाकण्याचे प्रकार, मनसेची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 07:29 PM2020-08-11T19:29:56+5:302020-08-11T19:31:30+5:30
डोंबिवली जिमखाना येथे उभारण्यात येत असलेल्या कोविड रुग्णालयाची पाहणी आमदार पाटील यांनी आज सायंकाळी केली.
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना खाटा टाकण्याचे प्रकार सुरु आहेत, अशी टीका मनसेचे आमदार राजू पाटील यांनी महापालिका अधिकारी व सत्ताधाऱ्यांवर कोणाचाही नामोल्लेख न करता केली आहे.
डोंबिवली जिमखाना येथे उभारण्यात येत असलेल्या कोविड रुग्णालयाची पाहणी आमदार पाटील यांनी आज सायंकाळी केली. यावेळी त्यांनी ही टीका केली. आमदार पाटील यांनी सांगितले की, हे कोविड सेंटर 10 जुलै रोजी सुरु होणार होते. आत्ता ते 15 जुलै रोजी सुरु होईल अशी आपेक्षा आहे. हे कोविड सेंटर अद्याप सुरु झालेले नाही. त्या आधीच याठिकाणी दोन व्हेंटिलेटर पडून होते.
मनसेचे राजेश कदम यानी हे व्हेंटिलेटर नेले व पुन्हा त्याठिकाणी आणून ठेवले. मात्र, प्रशासनाला त्याचे काही पडलेले नाही. हाच उद्देश ते नेऊन पुन्हा त्याचजागी आणून ठेवण्याचा होता. हेच व्हेंटिलेटर हे कोविड सेंटर सुरु होईपर्यंत अन्य रुग्णालयात रुग्णांच्या सेवेत दिले जावेत, अशी मागणी यापूर्वीच केली होती. त्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले गेले असल्याकडे आमदार पाटील यांनी लक्ष वेधले आहे.
पाटीदार भवन येथील कोविड रुग्णालयात एका रुग्णाला कोविडचे इंजेक्शन सांगितले. ते ठेवण्यासाठी फ्रीजची व्यवस्था नाही. त्या रुग्णाने ते इंजेक्शन घरी नेऊन फ्रीजमध्ये ठेवले. त्याला रुग्णाला दुस-या दिवशी डिस्चार्ज दिला गेला. यावरुन प्रशासनाचा सावळा गोंधळ उघड होत आहे. मुख्यमंत्र्यांच्याच भाषेत सांगायचे झाल्यास कोरोनाची जाण्याची इच्छा आहे. इथल्या राजकारण्यांना तो घालविण्याची इच्छा नाही अशी टीका आमदार पाटील यांनी केली आहे.
आज खासदार श्रीकांत शिंदे यानी मोठागाव ठाकूर्ली-माणकोली पूलाचा कामाची पाहणी केली. त्यावर खासदारांचे नाव न घेता आमदार पाटील मोठागाव ठाकूर्ली-माणकोली आणि पत्री पूलाचे काम हे कल्याण डोंबिवली महापालिकेचे हेरिटेज म्हणून घोषित करावे अशी मागणी मागणी केली आहे.