CoronaVirus News : ठाण्यात 800 हून अधिक मृत्यू कोरोनामुळे, किरीट सोमय्या यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 05:21 PM2020-06-26T17:21:12+5:302020-06-26T19:17:14+5:30
CoronaVirus News : शुक्रवारी सोमय्या यांनी मुंब्य्रातील कब्रस्थानची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत भाजपाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष निरंजन डावखरे , गटनेते संजय वाघुले यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
ठाणे : कोरोनामुळे (कोविड-19) मृत्यूचे प्रमाण मोठ्या गतीने वाढत आहे. कब्रस्थानमधील जागा देखील कमी होऊ लागली आहे. त्यामुळे राज्य सरकाराने कब्रस्थानसाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार अन्य जी काही ठिकाणे असतील त्याठिकाणी जागा वाढविली पाहिजे, अशी मागणी भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केली.
ठाकरे सरकार कोरोनाचे मृत्यू लपवित असल्याचा आरोपही त्यांनी केला. तर मुंब्य्रात लॉकडाऊनच्या कालावधीत 953 मृत्यू झाले असून त्यातील 400 हून अधिक मृत्यू हे कोरोनामुळे झाल्याचा धक्कादायक माहिती त्यांनी यावेळी दिली. तर ठाण्यात आतापर्यंत कोरोनामुळे 800 हून अधिक मृत्यू झाले असून ही माहिती लपवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
शुक्रवारी सोमय्या यांनी मुंब्य्रातील कब्रस्थानची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत भाजपाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष निरंजन डावखरे , गटनेते संजय वाघुले यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी हा गंभीर आरोप केला आहे. येथील एका कब्रस्थानमध्येच आतापर्यंत 142 मृतदेह दफन करण्यात आले आहेत. परंतु पालिका प्रशासन म्हणते कोरोनामुळे केवळ 277 मृत्यू झाले आहेत. परंतु ही आकडय़ांची लपवा लपवी कशासाठी केली जात आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
केवळ ठाकरे सरकार नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मुंबईत ज्या प्रकारे सुरवातीला 2200 मृत्यू झाल्याचे बोलले जात होते. मात्र प्रत्यक्षात तेथे 4400 मृत्यू झाल्याचे आता मान्य केले जात आहे. तीच परिस्थिती ठाण्यात देखील असून मृत्यूची संख्या लपविली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. महापालिका आकडे लपवित असल्याने नागरीक बाहेर पडत असून त्यांचा जीव धोक्यात घालण्याचे काम सत्ताधारी करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
दफनभूमीची क्षमता संपूनही मुंब्य्रातील मंत्री गप्प : निरंजन डावखरे
कोरोनाच्या संसर्गाने वाढत्या मृत्युमुळे मुंब्रा-कौसा येथील चार दफनभूमीपैंकी दोनची क्षमता संपली आहे. आणखी महिनाभरात दोन दफनभूमींमध्ये जागा राहणार नाही. त्यानंतर दफनविधी कुठे करायचे हा प्रश्न आहे. मात्र, या विषयावर मुंब्रावासियांचे प्रतिनिधीत्व करणारे मंत्री महोदय गप्प का आहेत, असा सवाल आमदार निरंजन डावखरे यांनी केली. या प्रश्नावर राज्य सरकार व महापालिकेवर दबाव आणण्याची आवश्यकता आहे. मुंब्रावासियांसाठी तत्काळ दफनविधीसाठी मोठी जागा राज्य सरकारने द्यावी, अशी मागणी डावखरे यांनी केली.