CoronaVirus News: कोरोना बाधितांमध्ये तरुण अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 01:11 AM2021-04-08T01:11:21+5:302021-04-08T01:11:57+5:30
तरुण पिढीलाच कोरोनाचा अधिक विळखा बसत आहे. त्यामुळे ज्येष्ठांपाठोपाठ आता तरुणांनाही सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
ठाणे : राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली असून, ठाण्यातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. परंतु, या लाटेत बाधित होणाऱ्यांमध्ये ज्येष्ठांच्या तुलनेत तरुणांचे प्रमाण अधिक आहे. तरुण पिढीलाच कोरोनाचा अधिक विळखा बसत आहे. त्यामुळे ज्येष्ठांपाठोपाठ आता तरुणांनाही सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
ठाण्यात आतापर्यंत ८७ हजार २८९ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यातील ७२ हजार ८९२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. एक हजार ४१४ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्यांची संख्या १२ हजार ९८३ एवढी आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी एका दिवसात ५० दिवसांवरून ४३ दिवसांवर आला आहे.
ठाणे पालिका हद्दीत सध्या दररोज १,५०० ते १,८०० च्या आसपास नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे त्यांना उपचारासाठी बेड उपलब्ध करून देण्यासाठीदेखील तारेवरची कसरत सुरू आहे. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ज्येष्ठांच्या तुलनेत तरुणांचे प्रमाण अधिक आहे. त्यात दिवसागणिक ही संख्या आणखी वाढताना दिसत आहे. तरुण मंडळी कामाच्या निमित्ताने घराबाहेर पडत असल्याने हे प्रमाण आता वाढताना दिसत असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंग पाळावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.
वयोगट एकूण रुग्ण
० ते १० ६,८२१
११ ते २० ३०,७१७
२१ ते ४० ३१,३१२
४१ ते ६० १४,८१५
६१ ते ८० १,६९९
१०० पुढील १
मार्च २०२१ मधील रुग्ण
वयोगट रुग्ण
० ते १९ ६८३
२० ते ३९ २,९०६
४० ते ५९ २,७६५
६० ते ७९ १,२४७
८० ते ९९ १४१
दररोज आढळणाऱ्या रुग्णांमध्ये लहान मुलांचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. त्यामुळे लहान मुलांनाही घराबाहेर पाठवू नका, असे आवाहन करण्यात आले आहे.