CoronaVirus News: मुंब्रा शहर कोरोनामुक्तीकडे; शुक्रवारी एकही नवा रुग्ण नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2020 12:35 AM2020-08-09T00:35:18+5:302020-08-09T06:52:25+5:30

दहा दिवसांत ५३ बाधित; विविध उपाययोजनांमुळे साथ आटोक्यात

CoronaVirus News Mumbra becoming Corona free No new patients on Friday | CoronaVirus News: मुंब्रा शहर कोरोनामुक्तीकडे; शुक्रवारी एकही नवा रुग्ण नाही

CoronaVirus News: मुंब्रा शहर कोरोनामुक्तीकडे; शुक्रवारी एकही नवा रुग्ण नाही

Next

- कुमार बडदे

मुंब्रा : ठाण्यात कोरोनाची सुरुवात ज्या मुंब्रा परिसरातून झाली, येथील झोपडपट्टी तसेच धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी रस्त्यावर मुक्तपणे फिरणाऱ्या नागरिकांमुळे येथील बाधितांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र, मागील १० दिवसांत येथे फक्त ५३ नवे कोरोनाबाधित आढळून आले असून, शुक्रवारी येथे एकही नवा रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे मुंब्य्राची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरू झाली आहे.

शहरातील अमृतनगर भागातील एका इमारतीमध्ये ४ एप्रिलला पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर, काही दिवसांमध्ये येथे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत गेली. यामुळे रुग्णवाढीच्या यादीत ठाणे मनपाच्या नऊ प्रभाग समित्यांमध्ये मुंब्रा तिसºया क्रमांकावर होते. कोरोनाला आळा घालण्यासाठी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन उपायुक्त मनीष जोशी, सहायक आयुक्त तथा प्रभारी उपायुक्त महेश अहेर, उपनगर अभियंता धनंजय गोसावी यांनी येथे अनेक उपाययोजना राबविल्या. वैद्यकीय अधिकारी, शिक्षक, कोरोना वॉरियर्स यांनी घरोघरी जाऊन नागरिकांची फिव्हरतपासणी करून त्यांच्यात कोरोनाची लक्षणे आहेत का, याची चाचपणी केली. तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी गोळ्यांचे मोफत वाटप केले.

कोरोनापासून वाचण्यासाठी घरात राहण्याचा सल्ला दिला. विविध स्तरांवर जनजागृती केली. वेळोवेळी मौलाना, स्थानिक लोकप्रतिनिधींची मदत घेण्यात आली. ज्या भागात जास्त रुग्ण आढळून येत होते, ते भाग सील करण्यात आले. लक्षणे नसलेल्या परंतु संशयित असलेल्यांवर येथील मौलाना अबुल कलाम स्टेडियममधील कोविड सेंटरमध्ये उपचार करण्यात आले. तसेच जे हायरिस्क कॉन्टॅक्टमध्ये होते, त्यांना क्वारंटाइन करण्यात आले. यामुळे ते पॉझिटिव्ह झाले नाहीत. कोरोनामुक्तीसाठी पोलीस आणि ठामपा प्रशासनाने राबविलेल्या उपाययोजनांना स्थानिकांनीही चांगला प्रतिसाद दिला. यामुळे येथील बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर आटोक्यात आली असून, आता मुंब्रा कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत आहे.

सध्या मुंब्रा शहर कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत आहे. ही आनंदाची बाब आहे. हे शहर कोरोनामुक्त व्हावे, यासाठी ठामपा प्रशासनाने मागील काही महिन्यांमध्ये येथे राबविलेल्या योजनांना पोलिसांनी वेळोवेळी सहकार्य केले. परिसर सील करताना परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी नागरिकांना कोरोनाचे गांभीर्य समजून सांगण्यात आले. बळाचा वापर न करता मास्क न वापरणाऱ्यांवर तसेच वाहतुकीचे नियम मोडणाºया दुचाकी तसेच रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली.
- मधुकर कड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंब्रा पोलीस ठाणे

मागील काही दिवसांमध्ये मुंब्रा येथील रुग्णांच्या आकडेवारीनुसार सध्या मुंब्रा कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत आहे. हे सांघिक कामाचे फळ आहे.
- प्रशांत पाटेकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी, मुंब्रा आरोग्य केंद्र

Web Title: CoronaVirus News Mumbra becoming Corona free No new patients on Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.