CoronaVirus News : ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोनाचे फक्त ५० रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2020 12:54 AM2020-11-02T00:54:05+5:302020-11-02T00:54:31+5:30
CoronaVirus News in Thane : विठ्ठल सायन्ना जिल्हा शासकीय रुग्णालयातील चांगली उपचारपद्धती, तज्ज्ञ डॉक्टरांची टीम तसेच औषधोपचारांसह सकस आहारामुळे रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे.
ठाणे : एकेकाळी कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या यंत्रणेवर ताण येत होता. अपुऱ्या पडणाऱ्या खाटांमुळे काही वेळा वाॅर्डातील जमिनीवर गाद्या टाकून रुग्णांवर उपचार करावे लागले. आतापर्यंत दोन हजार ९७७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून सध्या केवळ ५० रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. ही सकारात्मक आणि आशादायी बाब असल्याचे ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी सांगितले.
विठ्ठल सायन्ना जिल्हा शासकीय रुग्णालयातील चांगली उपचारपद्धती, तज्ज्ञ डॉक्टरांची टीम तसेच औषधोपचारांसह सकस आहारामुळे रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. मार्च महिन्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय हे केवळ कोरोनाग्रस्तांसाठी ठेवण्यात आले. एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीत कोरोनाचा कहर वाढल्याने जिल्हा रुग्णालयातही वाढत्या रुग्णांसाठी खाटांची संख्या अपुरी पडू लागली होती. सर्वसामान्य गरीब रुग्णांना जिल्हा रुग्णालयाचा मोठा आधार मिळाला. तज्ज्ञ डॉक्टर आणि सोयीसुविधांमुळे अनेक सेलिब्रिटींनीही या रुग्णालयाला पसंती दिली. औषधोपचारांबरोबरच करमणुकीसाठी संगीतापर्यंत सर्व सुविधा रुग्णांना येथे देण्यात आल्या. याशिवाय येथील डाॅक्टरांसह एकूणच यंत्रणेने घेतलेल्या अथक परिश्रमांची फलश्रुती म्हणून कोरोनासारख्या जीवघेण्या विषाणूचे रुग्ण ठाण्यात सद्य:स्थितीत कमी झाले आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालयात २०० खाटांची सुविधा आहे. त्यात २५ अतिदक्षता आणि १२५ ऑक्सिजन, तर ५० सामान्य कोरोना रुग्णांच्या खाटांचा समावेश आहे. याठिकाणी दाखल झालेल्या तीन हजार ५०३ रुग्णांपैकी तब्बल दोन हजार ९७७ रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर, काही जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.