CoronaVirus News: भिवंडीमध्ये रुग्णसंख्या नियंत्रणामुळे यंत्रणेवरील ताण झाला हलका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 01:02 AM2020-08-10T01:02:41+5:302020-08-10T01:02:52+5:30
विविध उपाययोजनांमुळे मागील तीन महिन्यांच्या तुलनेत ऑगस्टमध्ये रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण काही प्रमाणात हलका
- नितीन पंडित
भिवंडी : एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात भिवंडीत कोरोनाचा पहिला रु ग्ण आढळला. सुरु वातीच्या काळात रु ग्णसंख्या कमी होती. मात्र, मे आणि जूनमध्ये शहर व ग्रामीण भागांत रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. रु ग्णसंख्या अधिक व कोविड सेंटरची संख्या कमी, त्यातही आॅक्सिजन बेडची संख्या नाममात्र, अशी परिस्थिती असल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ झाली होती. मात्र, विविध उपाययोजनांमुळे मागील तीन महिन्यांच्या तुलनेत ऑगस्टमध्ये रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण काही प्रमाणात हलका झाला आहे.
शहरातील कोरोनाच्या वाढत्या समस्येला सोडविण्यासाठी पालिका प्रशासनाकडून सुरु वातीला आयजीएम रु ग्णालयाला कोविड रु ग्णालय म्हणून जाहीर केले. मात्र, केवळ १०० बेडच्या या कोविड रुग्णालयामुळे आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण वाढला होता. तो लक्षात घेता महापालिकेने शहरातील १० खासगी रु ग्णालयांना कोविड रु ग्णालयाची मान्यता दिली. मात्र, या खासगी रुग्णालयांमध्ये पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने या रु ग्णालयांवरही ताण वाढला होता. दरम्यान, काही खासगी रुग्णालयांकडून रु ग्णांची लूट होत असल्याच्या घटना समोर आल्या.
बेड अधिक, रुग्ण कमी
गणेशपुरी येथे ३०० बेड, तर सावद येथे 700 बेडचे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. आजमितीस, शहर व ग्रामीण भागांत सुमारे 3000 हून अधिक बेड कोविड रुग्णांसाठी उपलब्ध केले आहेत. तर, खासगी रुग्णालयेवगळता केवळ सरकारी कोविड रुग्णालयांमध्ये 80डॉक्टर असून परिचारिका व इतर वैद्यकीय कर्मचारी मोठ्या संख्येने आहेत. जूनच्या तुलनेत सध्या रु ग्णसंख्या कमी झाल्याने बेडसंख्या अधिक, तर रु ग्णसंख्या कमी असे भिवंडीतील चित्र आहे.
कोविड सेंटरसाठी २० ते ३० लाखांचा खर्च
सध्या शहरात 294 तर ग्रामीण भागांत ५८८ असे केवळ 882 रु ग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यासाठी तीन हजार बेड आधीच उपलब्ध आहेत. त्यामुळे गणेशपुरी येथील कोविड सेंटर तयार असूनही ते सुरू केले नाही.
कारण, एका सेंटरसाठी साधारणत: २० ते ३० लाखांचा महिना खर्च येतो. त्यामुळे गणेशपुरी येथील कोविड सेंटर सुरू केले नाही. मात्र, पूर्वतयारी म्हणून हे कोविड सेंटर सध्या तयार करून ठेवले आहे, अशी माहिती पालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन मोकाशी यांनी दिली.
दिवसाला रुग्णांची संख्या ३० च्या घरात
शहरात 218 बाधितांवर उपचार सुरू असून त्यामानाने वैद्यकीय कर्मचारी तीन ते चारपट जास्त आहेत.
शहरात आधी जी रुग्णसंख्या दिवसाला 200 ते २५० च्या घरात होती, ती आता १५ ते ३० च्या घरात आली आहे.
रुग्णसंख्या अशीच कमी राहिली, तर पुढे ओसवालवाडी व रईस हायस्कूल ही दोन कोविड सेंटर बंद करण्याच्या विचारात प्रशासन आहे. मात्र, अद्याप निर्णय झालेला नाही, अशी माहितीही डॉ. मोकाशी यांनी दिली.
प्रशासनाने रईस हायस्कूल, ओसवाल हॉल ताब्यात घेऊन तेथे कोविड सेंटर उभारली.