CoronaVirus News : ठाण्यात रुग्णांचा मृत्युदर पाच टक्क्यांनी वाढला, महापालिका आकडे लपवित असल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 12:09 AM2021-04-13T00:09:59+5:302021-04-13T00:10:36+5:30
CoronaVirus News: महापालिकेच्या जवाहरबाग स्मशानभूमीत रोजच्या रोज १५ ते २० मृतदेह जाळले जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे, तर इतर दोन स्मशानभूमीतही रोज ८ ते १० मृतदेह येत असल्याची माहिती स्मशानभूमीत काम करणाऱ्या कामगारांनी दिली.
- अजित मांडके
ठाणे : शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना आता मृत्युदरही वाढला आहे. यापूर्वी मृत्युदर दोन टक्क्यांच्या आसपास होता. आता तो ७.३ टक्क्यांच्या घरात गेला आहे. परंतु, महापालिकेच्या दप्तरी मात्र रोज ५ ते सात जणांचेच मृत्यू होत असल्याची आकडेवारी दिली जात आहे. महापालिकेच्या जवाहरबाग स्मशानभूमीत रोजच्या रोज १५ ते २० मृतदेह जाळले जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे, तर इतर दोन स्मशानभूमीतही रोज ८ ते १० मृतदेह येत असल्याची माहिती स्मशानभूमीत काम करणाऱ्या कामगारांनी दिली. त्यामुळे महापालिका पुन्हा मृत्यूंचा आकडा लपविते काय, असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे. गेल्या दोन दिवसांत ३५ मृत्यू झाल्याचा आरोपही करण्यात येत आहे. परंतु महापालिकेने तो फेटाळला आहे.
पालिका हद्दीत आतापर्यंत ९५ हजार ७३७ रुग्ण आढळले आहेत, तर ७८ हजार ४६२ जण उपचार घेऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत एक हजार ४४४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. यापूर्वी महापालिका हद्दीत मृत्युदर हा दोन टक्क्यांच्या आसपास होता. आता तो ७.३ टक्क्यांच्या घरात गेला आहे. परंतु, हा आकडा केवळ महापालिकेच्या दप्तरी आहे. प्रत्यक्षात पालिका हद्दीत रोजच्या रोज मृत्यूंचा आकडा वाढत आहे. स्मशानभूमीतील कामगारांशी चर्चा केली असता, जेव्हापासून शहरात कोरोना वाढत आहे, तेव्हापासून आमचादेखील ताण वाढला असल्याचे ते सांगतात. परंतु त्यांनादेखील ही माहिती उघड न करण्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळेच त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली. ठाणे महापालिकेच्या एकट्या जवाहर बाग स्मशानभूमीत रविवारी सुमारे २० मृतांवर अंत्यसंस्कार झाल्याची माहिती येथील सूत्रांनी दिली, तर मागील काही दिवसांत रोजच्या रोज १५ ते २० मृतदेहांना अग्नि देण्याचे काम केल्याचेही त्यांनी सांगितले. जवाहर बाग स्मशानभूमीत चार गॅस शवदाहिनी आहेत त्यामुळे येथे सध्या येथे येणाऱ्या मृतदेहांमुळे येथील कर्मचाऱ्यांवरील ताणदेखील वाढल्याचे दिसत आहे, तर उर्वरित वागळे आणि कळव्याच्या स्मशानभूमीतही रोजच्या रोज ८ ते १० कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कार केले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे रोजच्या रोज सरासरी आकडा जरी काढला १५ ते २० मृत्यू होत असल्याचे दिसत आहे. परंतु, महापालिकेच्या दप्तरी रोज ५ ते ७च मृत्यू दाखविले जात आहेत. त्यामुळे महापालिका कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू लपवित आहे का, असा सवाल पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. यापूर्वीदेखील मागील वर्षी अशाच प्रकारे पालिकेने मृत्यू लपविल्याने त्यांच्यावर टीका झाली होती. त्यामुळे आता किती मृत्यू महापालिका लपविते आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शनिवारी एका दिवसात ग्लोबल रुग्णालयात सुमारे २० मृत्यू झाले असल्याची माहितीदेखील समोर आली आहे. परंतु, पालिकेने हा दावा फेटाळला आहे. येथील रुग्णालयात दाखल एका रुग्णाने त्याच्या नजरेसमोरच आठ मृतदेह नेतांना पाहिले असल्याने त्याने ही माहिती दिली. परंतु, तसे काहीच झालेले नसल्याचा दावा महापालिकेने केला.
सव्वापाच तासांनंतर मिळाली रुग्णवाहिका
ठाण्यात एका खासगी रुग्णालयात एका रुग्णाचा पहाटे मृत्यू झाला. त्यानंतर सकाळी ९ वाजल्यापासून नातेवाइकांनी शववाहिनी मिळावी यासाठी फोन केला. तब्बल सव्वापाच तासानंतर ती मिळाली. त्यानंतर स्मशानभूमीत नेल्यानंतर एक तास त्यांना थांबावे लागले. त्यातही शववाहिनी मिळावी यासाठी संपर्क साधल्यानंतर आधी शासकीय रुग्णालयातील मृतदेह न्यायचे आहेत, त्यानंतर तुमच्याकडे येऊ, असे उत्तर रुग्णांच्या नातेवाइकांना मिळाले होते.
महापालिकेकडून मृत्यूंचा आकडा लपविला जात नाही. महापालिकेकडे जेवढी नोंदणी होत आहे, तेवढेच दाखविले जात आहे.
- संदीप माळवी, उपायुक्त, ठामपा