CoronaVirus News: रेमडेसिवीरसाठी रुग्णांच्या नातेवाइकाची भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 12:30 AM2021-04-08T00:30:28+5:302021-04-08T00:30:48+5:30
अंबरनाथ, बदलापूरमध्ये काळाबाजार : अनेक रुग्णांचा जीव धोक्यात
- पंकज पाटील
अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूर शहरात कोविड रुग्णांना गरज भासणार रेमडेसिवीर हे इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने मोठ्या प्रमाणात नातेवाईकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. हे इंजेक्शन मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना धडपड करावी लागत आहे. ते करुनही इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. एवढेच नव्हे तर इंजेक्शनचा काळाबाजार ही तेजीत सुरू आहे.
अंबरनाथ आणि बदलापूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असताना त्यातील गंभीर झालेल्या कोरोना रुग्णांवर उपचार करताना रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज भासत असल्याने संबंधित डॉक्टर ते इंजेक्शन आणण्याचा सल्ला कुटुंबीयांना देतात. मात्र प्रत्यक्षात हे इंजेक्शन कोठेच उपलब्ध होत नसल्याने एकेका इंजेक्शनसाठी धडपड करण्याची वेळ कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांवर आली आहे. मुळात इंजेक्शन अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये उपलब्ध होत नसल्याने अंबरनाथच्या नागरिकांना थेट कल्याण किंवा ठाणे येथे इंजेक्शनसाठी जावे लागत आहे.
अंबरनाथमध्ये ज्या खासगी रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरु आहे त्यांच्याकडून या इंजेक्शनची मोठी मागणी असून ती पुरविण्यात जिल्हा प्रशासन अपयशी ठरत आहे, तर दुसरीकडे पालिकेच्या कोविड रुग्णालयात एकही इंजेक्शन उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे. बदलापूर, अंबरनाथच्या सरकारी रुग्णालयात रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध व्हावे यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असतानाही जिल्हा प्रशासन पालिकेला हे इंजेक्शन उपलब्ध करून देत नसल्याची बाब समोर आली आहे.
त्यामुळे इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने त्या ठिकाणच्या नातेवाईकांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांत हजाराहून अधिक कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले असून त्यातील ४० ते ५० रुग्ण हे गंभीर असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मात्र त्यांना उपचारादरम्यान लागणारे रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने त्यांचा जीव धोक्यात आला आहे.
रेमडेसिवीर इंजेक्शनचा संपूर्ण जिल्ह्यात तुटवडा आहे. त्यामुळे पालिकेच्या कोविड रुग्णालयातही इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याची बाब खरी आहे.
-डॉ. नितीन राठोड, नोडल ऑफिसर, अंबरनाथ