CoronaVirus News: कल्याण-डोंबिवलीतील खासगी रुग्णालयांकडे रुग्णांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 01:20 AM2021-04-05T01:20:36+5:302021-04-05T01:20:52+5:30

खासगी कोविड रुग्णालयात २११ बेड रिक्त, रुग्णांच्या नातलगांना खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला

CoronaVirus News: Patients return to private hospitals in Kalyan-Dombivali | CoronaVirus News: कल्याण-डोंबिवलीतील खासगी रुग्णालयांकडे रुग्णांची पाठ

CoronaVirus News: कल्याण-डोंबिवलीतील खासगी रुग्णालयांकडे रुग्णांची पाठ

Next

- मुरलीधर भवार

कल्याण : कोरोनाच्या पहिल्या लाटेत खासगी रुग्णालयांनी केलेल्या लुटमारीच्या सुरस व चमत्कारिक कथा सर्वश्रुत असल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णांचा खासगी रुग्णालयांची पायरी न चढण्याकडे कल आहे. कल्याण-डोंबिवली शहरांत दररोज नवे हजारेक रुग्ण आढळत असून बहुतांश रुग्णांना केडीएमसीच्या कोविड रुग्णालयात उपचार घ्यायचे असल्याने तेथे रुग्णांची तुफान गर्दी झाली आहे तर खासगी कोविड रुग्णालयात २११ बेड चक्क रिक्त आहेत. केडीएमसीच्या रुग्णालयातील डॉक्टर रुग्णांच्या नातलगांना खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देत असतानाही रुग्ण खासगी रुग्णालयांत दाखल होण्यास तयार नाहीत.

केडीएमसी हद्दीत काही खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांनी बेडची चौकशी केली असता त्यांना बेड शिल्लक नसल्याचे सांगण्यात आले. मंत्रालयात कार्यरत असलेले आणि कल्याणमध्ये राहणारे कर्मचारी व त्यांच्या पत्नीलाही कोरोना झाला आहे. त्यांनी बेडची विचारणा केली असता त्यांना खासगी रुग्णालयात दुपारपर्यंत बेड उपलब्ध झालेला नव्हता. त्यांनी महापालिकेच्या आरोग्य खात्याशी संपर्क साधला असता आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांनी होलिक्रॉस, आयुष आणि अन्य एका खासगी रुग्णालयात चौकशी केली असता त्याठिकाणी बेड उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्याचवेळी अन्य काही खासगी रुग्णालयांत २११ बेड शिल्लक आहेत.

 खासगी रुग्णालयात बेड शिल्लक असताना रुग्णांचा सरकारी कोविड रुग्णालयात प्रवेश मिळावा याकडे अधिक कल दिसून येतो. कारण सरकारी रुग्णालयात उपचार मोफत मिळतात तर खासगी रुग्णालये बिलाकरिता मानेवर सुरा फिरवतात, असे रुग्णांच्या नातलगांचे म्हणणे आहे. 

भीती मनातून काढून टाका
खासगी रुग्णालयांनी रुग्णांची लूट करू नये याकरिता मनपाने पुन्हा खासगी रुग्णालयात ऑडिटर्सची नियुक्त्या केली आहे. सरकारी नियमानुसार बिल आकारले जात आहे की नाही याची दाद मागण्यासाठी हे ऑडिटर्स नेमले असल्याने नागरिकांनी बिलाची भीती मनातून काढून टाकावी, असे आवाहन मनपाने केले.

८० टक्के बेड कोविड रुग्णांसाठी आरक्षित 
महापालिका हद्दीत आजमितीस ४० खासगी रुग्णालयांत कोविड रुग्णांवर उपचार करण्यास महापालिकेने परवानगी दिली आहे. एखाद्या रुग्णालयाने परवानगी मागितल्यास त्याच दिवशी परवानगी दिली जात आहे. खासगी रुग्णालयातील एकूण बेडपैकी ८० टक्के बेड हे कोविड रुग्णांसाठी आरक्षित करण्यात आलेले आहेत. 

Web Title: CoronaVirus News: Patients return to private hospitals in Kalyan-Dombivali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.