CoronaVirus News: कृपया, सोशल डिस्टन्सिंग पाळा; महापौर, आयुक्तांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 11:47 PM2020-06-14T23:47:01+5:302020-06-14T23:47:15+5:30
ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांनी घराबाहेर न जाण्याच्या सूचना
कल्याण : ‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत केडीएमसी परिक्षेत्रात काही ठरावीक वेळेत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. सोशल डिस्टन्सचा नियम पाळण्यासंदर्भात सांगूनही तसे होत नसल्याने दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. ही चिंताजनक बाब असून सोशल डिस्टन्सच्या सूचना पाळा, मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा, असे आवाहन कल्याण-डोंबिवलीच्या महापौर विनीता राणे आणि महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दुकानदारांसह नागरिकांना केले आहे.
महापालिका क्षेत्रात अनलॉक-१ मध्ये ५ जूनपासून सम-विषम तारखांप्रमाणे सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. सोशल डिस्टन्स आणि अन्य अटींच्या आधारे दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली असली, तरी सोशल डिस्टन्स धाब्यावर बसवले जात असल्याचे चित्र बहुतांश ठिकाणी पाहायला मिळत आहे. कंटेनमेंट झोनमध्ये मात्र अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याठिकाणीही नियमांचे काटेकोर पालन होताना दिसत नाही.
एकीकडे कल्याण-डोंबिवलीत कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असताना त्याचे कोणतेही गांभीर्य नागरिकांना राहिलेले नसल्याचे एकूणच शहरातील वास्तव पाहता स्पष्ट होत आहे. महापौर राणे आणि आयुक्त सूर्यवंशी यांनी शनिवारी संयुक्त परिपत्रक जारी करून दुकानदार आणि नागरिकांना सोशल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच, नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये, असे सांगताना ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि १० वर्षांखालील मुलांनी घराबाहेर जाऊ नका, याकडेही परिपत्रकात लक्ष वेधले आहे. नागरिक नियमांचे पालन करत नसल्याने प्रशासनही हतबल झाले आहे.
कल्याणमध्ये दूधविक्रीलाही वेळेचे बंधन
कल्याण येथील दूधनाका परिसरात दूधविक्रीवरही वेळेचे बंधन घालण्यात आले आहे. सकाळी ६ ते ८ आणि दुपारी ३ ते संध्याकाळी ५ या वेळेतच दूधविक्री करता येणार आहे. तसेच, बाहेरील व्यक्तींना दूधखरेदी करण्यास मनाई केली आहे.
दूधनाक्यासह मौलवी कम्पाउंड, रोहिदासवाडा, अन्सारी चौक, मोहल्ल्यातील मच्छीबाजार, रेतीबंदर परिसर, टेकडी कबरस्तान आदी ठिकाणी कंटेनमेंट झोन घोषित केले आहेत.
मेडिकल स्टोअर्स, रुग्णालये, क्लिनिक, गॅस सिलिंडरपुरवठा यांना बंदी लागू राहणार नाही. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या कालावधीत बेकरी, दुधाची डेअरी, किराणा दुकाने, भाजीपाला इत्यादी दुकाने वगळता अन्य सर्व व्यावसायिक दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.