CoronaVirus News: "भिवंडीत १५ दिवसांच्या लॉकडाऊनची तयारी"
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 12:16 AM2020-06-16T00:16:30+5:302020-06-16T00:16:50+5:30
शहरात आतापर्यंत ५७० रुग्ण आढळले असून त्यापैकी १८० रुग्ण बरे झाले आहेत, तर २१ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
भिवंडी : शहरात कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता मनपा प्रशासन १५ दिवसांच्या लॉकडाऊनचा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती महापौर प्रतिभा पाटील यांनी दिली आहे. यासाठी मंगळवारी विशेष महासभा बोलावल्याचेही त्यांनी सांगितले.
शहरात आतापर्यंत ५७० रुग्ण आढळले असून त्यापैकी १८० रुग्ण बरे झाले आहेत, तर २१ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. यंत्रमाग नगरी असलेल्या या शहरातून बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक आदी राज्यांतील सुमारे दोन लाखांच्या वर कामगार आपल्या मूळगावी परतले आहेत.
शहरातील इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात केवळ १०० बेडचे कोविड रुग्णालय सुरू केले आहे. यामुळे सध्याच्या सर्वसामान्य रुग्णांची परवड होत आहे. रविवारी शहरात एकाच दिवसात १०० नवे रुग्ण आढळले. शहरातील वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यात मनपा प्रशासनाला अपयश आले आहे. त्यामुळे शहरात काही दिवसांचा लॉकडाऊन घोषित करावा, अशी मागणी नागरिकांनी केली होती. त्यानुसार १५ दिवसांचा कडक लॉकडाऊन घेण्यात येणार आहे, असे पाटील म्हणाल्या.