CoronaVirus News: खाजगी डॉक्टरांना विमाकवच नाही?; आयएमएचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2020 01:10 AM2020-10-04T01:10:12+5:302020-10-04T01:10:27+5:30
CoronaVirus News: ५०० हून अधिक डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू
डोंबिवली : खाजगी डॉक्टरांनी सेवा न दिल्यास त्यांच्यावर ‘मेस्मा’सारख्या कायद्यांतर्गत कारवाई केली जाते. पण, केंद्राने आदेश देऊनही या डॉक्टरांना कोरोनाकाळात ५० लाखांचे विमाकवच राज्याने दिलेले नाही. असा दुजाभाव का केला जात आहे, असा सवाल इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) राज्य अध्यक्ष मंगेश पाटे यांनी केला.
कोरोनाकाळात सेवा बजावताना आतापर्यंत सुमारे ५०० हून अधिक डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यातील अनेक डॉक्टरांचा त्यात समावेश आहे. डोंबिवलीतील एकाचा त्यात समावेश असून, त्याचे कुटुंबीय हवालदिल झाले आहेत. त्या डॉक्टरला एक आठ महिन्यांचे अपत्य आहे. वडिलांच्या मृत्यूमुळे त्या लहानग्याचे भवितव्य अंधारात आहे.
यंत्रणा ढासळलेली का?
जागतिक आरोग्य संस्थांनी देशात सप्टेंबरपर्यंत कोरोना कळस गाठेल, असे वेळोवेळी सांगितले असतानाही आपल्या येथे राज्यभर आरोग्य यंत्रणा ढासळलेली का? वेळोवेळी विविध उपाययोजना करण्यासाठी राज्य, केंद्र शासनाला पत्र, ई-मेल, झूम मीटिंग घेतल्या पण काहीच फायदा झालेला नाही. त्यात कोरोनामुळे आमच्या डॉक्टरांचे मृत्यू होत आहेत, हे आम्ही कसे सहन करायचे. आतापर्यंत आमच्या मागण्या, सूचनांकडे दुर्लक्ष करणाऱ्या शासनाने तातडीने डॉक्टरांच्या मृत्यूसंदर्भात पावले उचलून त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा द्यावा. अन्यथा, आम्हाला इच्छा असूनही सेवा देणे कठीण होईल, असे पाटे यांनी स्पष्ट केले.