ग्राहक येती दारा, तोची दिवाळी दसरा; हॉटेल व्यावसायिक सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 01:06 AM2020-10-06T01:06:34+5:302020-10-06T01:07:45+5:30
कुठे गर्दी, तर कुठे शुकशुकाट
ठाणे : हॉटेल व्यावसायिकांनी सोमवारपासून व्यवसायाचा शुभारंभ केला. ‘ग्राहक येती दारा, तोची दिवाळी दसरा’ अशा शब्दांत स्वागत करीत काही हॉटेलबाहेर चक्क कंदीलही पाहायला मिळाले. पहिल्या दिवशी मोजक्याच हॉटेलमध्ये गर्दी, तर बहुतांश ठिकाणी शुकशुकाट होता.
व्यावसायिकांनी हॉटेलमध्ये आधीच स्वच्छता करून घेतली होती. काही हॉटेलमध्ये डिस्पोजबल प्लेट्स, वाटी, चमचे, ग्लास वापरण्यात येत आहेत. काहींनी मेन्यूकार्ड बंद करून क्यूआर कोडवर आॅर्डर देण्याचे आवाहन केले आहे. ग्राहकांना वापरलेल्या प्लेट्स, वाटी, चमचे, ग्लास टाकण्यासाठी डिस्पोजेबल पिशवी दिली जात आहे. वेटर वाढायला न येता थेट किचनमधून थाळी घेऊन टेबलवर ठेवली जात असल्याचे हॉटेल व्यावसायिक सनी पावसकर यांनी सांगितले.
घेतली जाणारी दक्षता : हॉटेलबाहेर सॅनिटायझर ठेवण्यात आले आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी एक टेबल सोडून दुसऱ्या टेबलवर ग्राहकांना बसण्यास सांगितले जात आहे.
वेटर हे मास्क आणि ग्लोव्हज घालून सेवा देत आहेत. ग्राहकांचे तापमान तपासले जात असून नाव, मोबाइल आणि किती वाजता आले, याच्या नोंदी घेत आहेत.
दहा टक्केच हॉटेल उघडले... : संध्याकाळी होत असलेला खरा व्यवसाय करण्यास परवानगी नसल्याने ठाण्यात सोमवारी १० टक्केही रेस्टॉरंट आणि बार उघडले नव्हते.
कल्याण-डोंबिवलीतही प्रतिसाद नाही : कल्याण-डोंबिवलीतील हॉटेलमध्येही प्रत्यक्ष खानपान सेवा न देता केवळ पार्सलवरच व्यावसायिकांनी भर दिला.
स्थानिक प्रशासनाचे वेगळे नियम नाही
राज्य शासनाने दिलेल्याच अटी व नियमांचे पालन शहरातील हॉटेल व्यावसायिकांना करायचे आहे. याबाबत महापालिकेचे वेगळे काही नियम नाहीत, असे ठाणे महानगरपालिका उपायुक्त संदीप माळवी यांनी सांगितले.
आज संकष्टी चतुर्थी असल्याने उपवासाचे पदार्थ खाण्यासाठी हॉटेलमध्ये आलो. हॉटेल सुरू होण्याची वाट पाहत होतो. हॉटेलमध्ये सुरक्षितता पाळली जात असल्याने उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवण्यास हरकत नाही.
- वैभव पाटील,
ग्राहक
कोरोनाचे नियम पाळून ग्राहकांच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज आहोत. हॉटेल/रेस्टॉरंटचा व्यवसाय हा रात्रीच्या जेवणावर जास्त अवलंबून असतो. त्यामुळे शासनाने वेळ वाढवून सकाळी ११ ते रात्री ११ वाजेपर्यंत करावी.
-राघवेंद्र शेट्टी,
हॉटेल व्यावसायिक
दरवाढ नाही
खाद्यपदार्थांच्या दरांत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. परंतु, पदार्थांमध्ये बदल झाला आहे. जिथे सिंगल पदार्थ मागविले जात होते, तिथे कॉम्बो मेन्यू केले आहे. ग्राहकांना थेट थाळी दिली जाणार असल्याचे व्यावसायिक सनी पावसकर यांनी सांगितले.