CoronaVirus News: रुग्णांना १६ लाख रुपये केले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 01:22 AM2020-08-11T01:22:31+5:302020-08-11T01:22:38+5:30
कोविड रुग्णांची लूट १५ रुग्णालयांना बजावल्या नोटिसा
कल्याण : कोरोना रुग्णांकडून सरकारने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जादा रकमेची बिले आकारणाऱ्या १५ रुग्णालयांना केडीएमसी प्रशासनाने नोटिसा पाठविल्या आहेत. या रुग्णालयांनी उपचारापोटी एकूण ३१ लाख ४५ हजार रुपये जास्तीचे आकारले आहे. त्यापैकी १६ लाख १५ हजार रुपये वसूल करून संबंधित रुग्णांना पालिकेने परत केले आहेत.
महापालिकेने प्रत्येक रुग्णालयात एक कर्मचारी नेमला होता. त्याने शहानिशा केल्यावर रुग्णालयाने बिल स्वीकारावे, असे आदेश मनपाने दिले होते. तरीहीही काही रुग्णालये रुग्णांची लूट करीत होते.
मनपाचे मुख्य लेखा अधिकारी सत्यवान उबाळे यांच्या नियंत्रणाखाली भरारी पथकाचे अधिकारी विनय कुलकर्णी यांनी तपासणी केली असता १५ रुग्णालयांकडून जादा बिल आकारल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मनपाने त्यांना नोटिसा पाठविल्या. ३१ लाख ४५ रुपये रक्कम आक्षेपार्ह आढळून आली. त्यापैकी १६ लाख १५ हजार रुपये वसूल करून संबंधित रुग्णांना परत देण्यात आले आहेत. उर्वरित १५ लाख तीन हजार रुपयेदेखील वसूल केले जातील.
श्रीदेवी रुग्णालयास विचारला जाब
कल्याणमधील श्रीदेवी रुग्णालयाने एका रुग्णाच्या बिलात कोविड कचºयाचेही बिल लावले होते. याप्रकरणी शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी आयुक्तांकडे तक्रार केली होती. आयुक्तांनी याप्रकरणी रुग्णालयास नोटीस पाठवली आहे. महापालिकेच्या दफ्तरी रुग्णालयाचा असलेला परवाना रद्द का करण्यात येऊ नये, अशी विचारणा यात केली आहे.