CoronaVirus News: मास्क न घालणाऱ्यांकडून २५ लाखांचा दंड; केडीएमसीची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 12:46 AM2020-10-07T00:46:17+5:302020-10-07T00:46:27+5:30
फॅमिली डॉक्टरांकडून १२ हजार जणांची चाचणी
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत मास्क न घालता फिरणाºया नागरिकांकडून आतापर्यंत २५ लाख रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केडीएमसी हद्दीत मनपाकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. अनलॉकमध्ये अनेक नागरिक मास्क न लावताच फिरत आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात केडीएमसीने दंडात्मक कारवाईची मोहीम उघडली. मनपाने आतापर्यंत २५ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. दंड वसूल करणे ही काही चांगली बाब नाही. मात्र नागरिकांना मास्क घालण्याची सवय व्हायला हवी. मास्क घातल्यास त्या कारवाईला सामोरे जावे लागणार नाही, असे सूर्यवंशी यांनी सांगितले.
केडीएमसी हद्दीत फॅमिली डॉक्टर कोविड फायटर ही मोहीम यापूर्वी राबविली होती. या मोहिमेंतर्गत फॅमिली डॉक्टरांनी आतापर्यंत १२ हजार नागरिकांची तपासणी केली आहे. फॅमिली डॉक्टरांना पुरवलेल्या अण्टिजेन किटद्वारे नागरिकांची मोफत चाचणी केली जात आहे. फॅमिली डॉक्टर कोविड फायटर ही मोहीम सुरूच असून आता ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत सर्वेक्षणाचे काम सुरू आहे.
केडीएमसीने डोंबिवली जिमखाना, क्रीडासंकुल, पाटीदार भवन, कल्याणमध्ये आसरा फाउंडेशनची शाळा, वसंत व्हॅली येथे जम्बो कोविड केअर सेंटर व रुग्णालये उभारल्याने रुग्णांसाठी पुरेसे बेड हे आॅक्सिजन व आयसीयूयुक्त आहेत, असे आयुक्तांनी सांगितले. या सगळ्या उपाययोजनांमुळे कोरोना रुग्णांचा मृत्युदर हा १.९ टक्के आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९० टक्के आहे.