CoronaVirus News : रुग्णांच्या सान्निध्यात राहून ती देतेय धीर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 01:01 AM2020-06-24T01:01:48+5:302020-06-24T01:02:03+5:30
स्वत: दोनदा पॉझिटिव्ह होऊन बरी झाल्यानंतर ती पुन्हा रुग्णांची सेवा करीत आहे.
ठाणे : कोरोनाच्या संकटात अनेक हौशे-गवशे कोरोना योद्धा म्हणून मिरवत आहेत. सोशल मीडियावर तर अशा स्वयंघोषित योद्ध्यांचा जणू महापूरच आला आहे. मात्र, या लढ्यात खरे योद्धे जीव धोक्यात घालून इतरांचा जीव वाचवत आहेत. ठाण्यातील एक कोरोना योद्धा महिला हेच काम करीत आहे. स्वत: दोनदा पॉझिटिव्ह होऊन बरी झाल्यानंतर ती पुन्हा रुग्णांची सेवा करीत आहे.
ठाण्यातील वसंत विहार परिसरात आढळलेला पहिला रुग्ण होरायझन रुग्णालयत दाखल झाला होता. तो रुग्णही या ३५ वर्षीय महिला योद्ध्याने हाताळला. या रुग्णालयात दाखल झालेल्या सुमारे १०० हून अधिक रुग्णांची तिने सेवा केली. सहा वर्षीय मुलीपासून ते ७० वर्षीय वृद्धापर्यंत तिने सर्वांचीच काळजी घेतली. एका पोलिसासह त्यांच्या सहा वर्षीय मुलीला दाखल केल्यावर त्यांचीही तिने सेवा केली. लहान मुलीला जेवण भरविण्यापासून तिला आंघोळ घालण्यापर्यंतची कामे केली. तिचे सर्व हट्ट पुरविले. म्हणूनच ती बरी होऊन घरी गेल्यानंतर आजही तिची आठवण काढते. सुनीता नावाच्या या योद्ध्याला कोरोना वॉर्डमध्ये रुग्णांची सेवा करताना कोरोनाची लागण झाली. तरीही न डगमगता तिने या विषाणूचा मुकाबला केला. योद्ध्याप्रमाणे मुकाबला करून त्यातून पूर्ण बरी होऊन घरी आली. आता आधीचे काम गेल्याने ती मुलुंडमध्ये अॅपेक्स कोरोना रुग्णालयात कोरोना वॉर्डमध्ये रुग्णांची सेवा करते.
ज्या रुग्णांचे मनोधैर्य खचलेले असते, त्यांना ती स्वत:चा अनुभव सांगते. ती दोनदा कशी या आजारातून बाहेर आली, त्याची कहाणी सांगून हिंमत हरलेल्या रुग्णांना धीर देते. रुग्णांना धीर देणाऱ्या या योद्ध्याचा चेहरा त्यांनी पाहिलेला नाही. पीपीई किटमध्ये लपलेले तिचे सडसडीत शरीर आणि कोरोनारक्षक चष्म्यातून तिचे दिसणारे डोळे हीच काय ती तिची ओळख आहे. ज्या वॉर्डात डॉक्टर, नर्स रुग्णांना हात न लावता लांबूनच त्यांची तपासणी करतात, तिथे ही योद्धा त्यांचे शरीर पुसून स्वच्छ करते, स्वत:च्या खांद्याचा आधार देऊन त्यांना शौचालयात घेऊन जाते, हाताने जेवण भरवते.
>एकदा कोरोना होऊन गेल्याने त्याची कशी काळजी घ्यायची याची कल्पना आली आहे. कोरोनाबाधित असताना जे अनुभव आले, माणसांना ओळखण्याची संधी मिळाली, जे भोगले ते इतरांनी भोगू नये म्हणून पॉझिटिव्ह रु ग्णांची सेवा करते. या आजारामधून पूर्ण बरे होता येते हे माझ्या उदाहरणातून समजावून सांगते. दोन दिवसांपूर्वीच एक ज्येष्ठ नागरिक बरे होऊन घरी जात होते. तेव्हा मी किट काढलेल्या अवस्थेत खाली उभी होते. दुसºया मावशीसोबत बोलत होते. माझा आवाज ओळखून ते रु ग्ण माझ्याजवळ आले आणि तूच सुनीता ना? असे म्हणत त्यांनी माझे खास आभार मानले. यातच मला समाधान आहे. - सुनीता, ठाणे