Coronavirus News: धक्कादायक! ठाण्यात पुन्हा दोन दिवसात दहा पोलिसांना कोरोनाची लागण: बाधितांची संख्या ३१४
By जितेंद्र कालेकर | Published: June 19, 2020 08:12 PM2020-06-19T20:12:19+5:302020-06-19T20:23:15+5:30
परप्रांतीय मजूर त्यांच्या गावी पाठविण्याचे तसेच लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यामुळे रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना हटकण्याचे काम आता पोलिसांनी कमी केले आहे. तरीही पोलिसांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात कमी झालेले नाही. गेल्या दोन दिवसांमध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात दहा पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना होण्याचे सत्र अद्यापही सुरुच आहे. बुधवार आणि गुरुवारी या दोन दिवसांमध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील एक महिला आणि दोन जमादारासह दहा पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. या सर्वांना ठाणे, अंबरनाथ आणि कल्याण येथील खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. त्यामुळे पोलिसांमधील बाधितांची संख्या ३१४ वर पोहचली आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये पोलिसांमध्ये कोरोना होण्याचे प्रमाण हे काही प्रमाणात कमी झाले होते. परंतू, १७ आणि १८ जून या दोन दिवसांमध्ये पुन्हा काही जणांना कोरोनाची लागण झाली आहे. १७ जून रोजी कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यातील दोन पोलीस हवालदारांसह तिघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. या तिघांना निआॅन, आर. आर. हास्पीटल आणि टाटा आमंत्रा या रुग्णालयांमध्ये दाखल केले आहे. कोळसेवाडीच्या एका पोलीस नाईकालाही बुधवारी टाटा आमंत्रामध्ये तर अंबरनाथच्या शिवाजीनगरच्या एका पोलीस नाईक महिलेला बदलापूरच्या पोतदारमध्ये तर अंबरनाथच्या पोलीस हवालदारालाही कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याला सिटी हॉस्पीटल मध्ये दाखल केले. एकाच दिवशी या सात पोलिसांना वेगवेगळया रुग्णालयात कोरोनाच्या उपचारासाठी दाखल करावे लागले. दरम्यान, १८ जून रोजी पोलीस मुख्यालयाचे जमादार, वाहतूक नियंत्रण शाखेचे हवालदार आणि वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल अशा तिघांचा अहवालही १८ जून रोजी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे या तिघांनाही वेदांत रुग्णालयात दाखल केले आहे.
आता या सर्व कोरोनाबाधित पोलिसांच्या संपर्कातील व्यक्ती आणि पोलिसांची माहिती घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आतापर्यंत २९ अधिकारी आणि २८५ कर्मचारी अशा ३१४ पोलिसांना कोरोनाची लागण झाली. त्यातील दोघांचा मृत्यु झाला असून २४५ पोलिसांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.