Coronavirus news: धक्कादायक! ठाण्यात कोरोनामुळे २४ तासांतच दोन पोलिसांचा मृत्यु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 09:55 PM2020-09-14T21:55:16+5:302020-09-14T22:01:47+5:30
गेल्या २४ तासांमध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील दोन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यु झाला असून तीन अधिकाऱ्यांसह आठ पोलीस नव्याने बाधित झाले आहेत. आतापर्यंत २१ कोरोनाबाधितांचा तर दोन कोरोना संशयित पोलिसांचा मृत्यु झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: गेल्या २४ तासांमध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात दोन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. कोपरी पोलीस ठाण्यातील हवालदार राजेंद्र महाडीक (५१, रा. कशेळी, भिवंडी) यांचा कोरोनावरील उपचारादरम्यान रविवारी तर विशेष शाखेचे जमादार सिद्धार्थ गायकवाड (५४) यांचाही कोरोनामुळे सोमवारी सायंकाळी ४.४५ वाजण्याच्या सुमारास मृत्यु झाला. त्यामुळे आयुक्तालयातील कोरोनामुळे मृतांची संख्या २१ वर पोहचली आहे. गेल्या २४ तासांमध्ये एका निरीक्षकासह आठ पोलिसांना लागण झाल्यामुळे बाधित पोलिसांची संख्याही एक हजार ४०८ इतकी झाली आहे.
कोपरीचे हवालदार महाडीक यांना ४ आॅगस्ट रोजी सर्दी तापामुळे भिवंडी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. ९ आॅगस्ट रोजी त्यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली. हा अहवाल ११ आॅगस्ट रोजी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना अॅव्हेन्यू या कोविड रुग्णालयात दाखल केले होते. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रेमडिसिविर इंजेक्शन देण्यात आले. ५ सप्टेंबर रोजी त्यांना प्लाझमा थेरपीही करण्यात आली. मात्र, १३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यु झाला. कल्याणच्या आधारवाडी जेल रोड परिसरात राहणा-या गायकवाड यांना चार दिवसांपूर्वीच कल्याणच्या आयुष रु ग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान १४ सप्टेंबर रोजी त्यांचा मृत्यु झाला.
* दरम्यान, गेल्या २४ तासांमध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील विठ्ठलवाडीचे निरीक्षक, चितळसरचे सहायक पोलीस निरीक्षक आणि मुख्यालयाचे उपनिरीक्षक असे तीन अधिकारी बाधित झाले. तर मानपाडयाचे दोन, नारपोली, भाईवाडा, महात्मा फुले येथील प्रत्येकी एकासह पाच कर्मचारी बाधित झाले. आतापर्यंत एक अधिकारी आणि २० कर्मचा-यांचा मृत्यु झाला असून दोन कोरोना संशयित पोलिसांचाही मृत्यु झाला आहे. तर १४४ अधिकारी आणि एक हजार २६४ कर्मचारी बाधित झाले. आतापर्यंत एक हजार २६८ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे.