Coronavirus News: ठाण्यातील धक्कादायक प्रकार: मृत्यूनंतर फेसबुक अकाऊंटवरुन आली फ्रेंड रिक्वेस्ट
By जितेंद्र कालेकर | Published: July 13, 2020 01:21 AM2020-07-13T01:21:47+5:302020-07-13T01:28:02+5:30
कोरोनामुळे मृत्यु झालेल्या एका सहकारी बँकेचे सह व्यवस्थापक अजित रानडे यांच्या फेसबुक अकांऊंटद्वारे फ्रेंड रिक्वेस्ट टाकून काही जणांकडे ठकसेनांनी पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात घडला आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हे बनावट खाते असून त्याद्वारे कोणीही व्यवहार करु नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: तीनच दिवसांपूवी कोरोनामुळे मृत्यु झालेल्या एका सहकारी बँकेचे सह व्यवस्थापक अजित रानडे यांच्या फेसबुक अकांऊंटद्वारे फ्रेंड रिक्वेस्ट टाकून काही जणांकडे ठकसेनांनी पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात घडला आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून कोणाकडेही पैशांची मागणी केली नसून कोणीही या खात्याशी आर्थिक व्यवहार करू नये, असे आवाहन रानडे कुटूंबीय तसेच नौपाडा पोलिसांनी केली आहे.
रानडे यांच्या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट पाठविण्यात आलेले खाते हे बनावट असल्याचीही माहिती समोर आली आहे. विशेष ज्यांना ज्यांना ही रिक्वेस्ट पाठविण्यात आली, अशा १० ते १५ जणांकडे या ठकसेनाने प्रत्येकी ३५ हजारांची मागणी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
५५ रानडे यांचे ७ जुलै रोजी कोरोनामुळे निधन झाले होते. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांमध्ये ९ जुलै रोजी अजित रानडे या नावाने त्यांचे नातेवाईक, मित्र मंडळी तसेच बँकेतील त्यांचे सहकारी यांना फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आली. रानडे यांचे निधन झाल्याचे त्यांच्यापैकी बहुतांश जणांना माहित होते. त्यामुळे या फ्रेंड रिक्वेस्टचा अनेकांना धक्काच बसला. अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केले. काहींनी अजित यांचे भाऊ तसेच इतर नातेवाईकांना फोन करून अजित रानडे यांचे खरोखर निधन झाले का? अशीही चौकशी केली. विशेष म्हणजे मित्रमंडहींप्रमाणेच अजित रानडे यांच्या मुलीला, भावाला देखील ही फ्रेन्ड रिक्वेस्ट आली होती. कोणीतरी अजित रानडे यांच्या नावाचे बनावट फेसबुक खाते तयार करून सर्वाना एकाच वेळी रिक्वेस्ट पाठविल्याचे रानडे कुटूंबियांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ फेसबुककडेही याबाबतची तक्रार करुन हे बनावट खाते बंद करण्याची विनंती केली. ज्यांनी ही रिक्वेस्ट मान्य त्यांना एका मेलद्वारे रानडे यांना पैशांची तातडीची गरज असल्याचे भासविण्यात आले. पेटीएमद्वारे ३५ हजार रुपयांची यात मागणी करण्यात आली. अनेकांनी त्यांच्या कुटूंबियांकडे याबाबतची खातरजमा केली तेंव्हा अनेकजण फसवणूक होण्यापासून वाचले.
अजित रानडे यांचे तीन दिवसांपूर्वीच निधन झाले असून त्यांच्याकडून अशी कुठल्याही प्रकारची पैशांची मदत त्यांनी किंवा नातेवाईकांनी मागितलेली नाही. या खात्याशी कोणीही आर्थिक व्यवहार करू नये, असे आवाहन रानडे यांचे भाऊ मिलिंद रानडे तसेच नौपाडा पोलिसांनी केले आहे.
‘‘ मुळात, नागरिकांनीही कोणत्याही अनोळखी फ्रेंन्ड रिक्वेस्ट तसेच आपण हिरो सारखे दिसता वगैरे सारख्या लिंक बघू नये. तरीही अशी एखादी फ्रेंन्ड रिक्वेस्ट स्वीकारली. तर प्रत्यक्ष याबातची खातरतमा करुनच व्यवहार करावेत. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात बनावट फेसबुक खाते तयार करुन पैशांची मागणी करणाऱ्याविरुद्ध तक्रार दाखल झाली आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू आहे.’’
निलेश मोरे, सहायक पोलीस निरीक्षक, नौपाडा.