Coronavirus News: लॉकडाऊन शिथिल करताच सोशल डिस्टसिंगचा ठाण्यात फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 11:39 PM2020-07-20T23:39:56+5:302020-07-20T23:45:21+5:30
केवळ कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी सध्या ठाणे महापालिकेने कडक निर्बंध ठेवले आहेत. अन्यत्र लॉकडाऊन शिथिल केले आहे. तरीही भल्या पहाटे पासूनच लॉकडाऊनचे नियम तुडविणाºया भाजी विक्रेते तसेच अन्य २५० पेक्षा अधिक व्यापाऱ्यांवर ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथक आणि पोलिसांनी सोमवारी धडक कारवाई केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: व्यापारी तसेच नागरिकांच्या जोरदार मागणीनंतर केवळ कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी सध्या ठाणे महापालिकेने कडक निर्बंध ठेवले आहेत. अन्यत्र लॉकडाऊन शिथिल केले आहे. तरीही भल्या पहाटे पासूनच लॉकडाऊनचे नियम तुडविणा-या भाजी विक्रेते तसेच अन्य व्यापा-यांवर ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथक आणि पोलिसांनी सोमवारी धडक कारवाई केली. यामध्ये पाच टेम्पो जप्त केले असून तब्बल २५० विक्रेत्यांवर कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राज्याप्रमाणे ठाणे शहरातही अनलॉक २ ची प्रक्रीया सुरु झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचे नियम ब-याच अंशी शिथिल केले आहेत. त्यामुळे जीवनाश्यक वस्तूंचे मार्केट,भाजी मार्केट त्याचबरोबर इतर दुकाने ही सम आणि विषम तारखेला सुरु ठेवण्याची मुभा पालिका प्रशासनाने २० जुलैपासून दिली आहे. हे सर्व होत असतांना कोणीही नियमांचे उल्लंघन करणार नाही, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असा इशारा रविवारी पालिका प्रशासनाने दिला होता. तरीही सर्रास सोशल डिस्टसिंगचे नियम तोडणाºया मुख्य बाजारपेठेतील ११ व्यापा-यांवर कारवाई केली असून ही दुकाने आता सील केली आहेत. नौपाडा प्रभाग समितीअंतर्गत जांभळी नाका मुख्य भाजीपाला मार्केट परिसरात सोमवारी पहाटे १ ते सकाळी ९ पर्यंत लॉकडाऊनचे नियम तोडणाºया १८ विक्रेत्यांवर कारवाई झाली. ही कारवाई उपायुक्त संदीप माळवी यांच्यासह सहायक आयुक्त प्रणाली घोंगे आदींच्या ५० ते ६० कर्मचा-यांच्या पथकाने केली. ठाणेनगर पोलीस ठाण्याचे पथकही या कारवाईमध्ये सहभागी झाले होते. त्याचबरोबर सात हातगाडयाही तोडण्यात आल्या. अशीच कारवाई कळवा नाका, हाजूरी, जवाहर बाग अग्निशमन केंद्र आणि कोपरी याठिकाणच्या मार्केटमध्येही झाली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिक आणि व्यापाºयांचेही सहकार्य अपेक्षित आहे. लॉकडाऊनचे नियम तोडणाºयांवर यापुढेही अशीच कारवाई केली जाणार असल्याचा इशारा उपायुक्त माळवी यांनी दिला आहे.
..............................
अशी झाली कारवाई
ठाणे मुख्य भाजीपाला मार्केट- २५० विक्रेते
कळवा नाका- ३०
जवाहरबाग - १५
कोपरी- १५
* असा होता पालिकेचा ताफा
उपायुक्तांसह ६० कर्मचारी
सुरक्षा रक्षक २५
वाहने - ८
..................................
सोशल डिस्टसिंगचे नियम न पाळणाºया नागरिकांसह व्यापाºयांवर कारवाईचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी आदेश दिले होते. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी व्यापारी आणि नागरिकांनी सोशल डिस्टसिंगचे नियम पाळणे, मास्क लावणे आणि गर्दी न करणे या मुलभूत गोष्टी केल्याच पाहिजे. नियमांचे पालन करुनही भाजी आणि किराणा मालाची खरेदी आणि विक्री झाली पाहिजे. अन्यथा, ही कारवाई केली जाणार आहे.
संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे महापालिका.
.........................
‘‘वारंवार आवाहन करुनही अगदी पती पत्नी केवळ भाजी खदेदीसाठी घराबाहेर पडतात. कोरोनामुक्तीसाठी सर्वांनीच सामुहिकपणे एकत्रित लढा देणे गरजेचे आहे. मास्क, सॅनिटायझर, स्वच्छता आणि गर्दी न करणे या नियमांचे पालन झालेच पाहिजे.’’
राम सोमवंशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ठाणे
..........................