Coronavirus News: कोरोनामुळे होणारे मृत्यू दर कमी करण्याचे टार्गेट ठेवा: ठाण्याच्या पालकमंत्र्यांनी दिले प्रशासनाला आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 02:01 AM2020-07-14T02:01:44+5:302020-07-14T02:05:17+5:30

तातडीने निदान करुन, तात्काळ उपचारावर भर द्या. कोरोनाचा पाठलाग करुनच धारावीच्या धर्तीवर ठाण्यातूनही कोरोनावर मात करायची आहे. कोरोनामुळे होणारे मृत्यू दर कमी करण्याचे टार्गेट ठेवा. त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा, असे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात दिले. ‘मिशन झिरो’ या मोहिमेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

Coronavirus News: Target to reduce coronavirus death: Guardian Minister orders administration | Coronavirus News: कोरोनामुळे होणारे मृत्यू दर कमी करण्याचे टार्गेट ठेवा: ठाण्याच्या पालकमंत्र्यांनी दिले प्रशासनाला आदेश

‘मिशन झिरो’ मोहिमेचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

Next
ठळक मुद्देपाठलाग केल्यानेच हा लढा यशस्वी होईल‘मिशन झिरो’ मोहिमेचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभपालिकेच्या नऊ प्रभाग समित्यांमध्ये मोबाईल डिस्पेन्सरीमार्फत होणार उपचार

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कोरोनाविरूद्धचा लढा यशस्वी करायचा असेल तर त्याचा प्रामाणकिपणे पाठलाग करून त्याची साखळी तोडण्याची गरज आहे. कोरोनामुळे होणारा मृत्यू दर कमी करण्यासाठीचे सर्वतोपरी प्रयत्न करा. तसेच टार्गेट ठेवून नगरसेवकांचीही समिती स्थापन करा, रुग्ण बरा होण्यासाठी खासगी डॉक्टरांकडेही चौकशी करा, तरच ‘मिशन झिरो’ हे धारावीप्रमाणे यशस्वी होईल, असे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाला सोमवारी दिले.
कोरोनाविरूद्धचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी ठाण्यात १३ जुलैपासून ‘मिशन झिरो’ या मोहिमेचा शुभारंभ महापालिकेमध्ये करण्यात आला. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. कोरोनावरील उपचारासाठी महापालिका तसेच भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम नऊ प्रभाग समित्यांच्या क्षेत्रामध्ये राबविला जाणार आहे. यावेळी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र फाटक, क्र ीडा समिती सभापती अमर पाटील, शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री पुढे म्हणाले की, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आपण त्याच्या मागे लागलो पाहिजे. त्यासाठी मोठया प्रमाणात लोकांना क्वारंटाईन सेंटरमध्ये स्थलांतरित करण्याची गरज आहे. हे जर झाले तर योग्यवेळी रूग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करता येतील आणि मृत्यूचा दर कमी करणे शक्य होईल. सद्य:स्थितीत मोठया प्रमाणात चाचण्यांची संख्या वाढविल्याने रुग्णांची संख्या वाढली तरी हरकत नाही. पण योग्यवेळी रूग्णांना शोधून त्यांच्यावर उपचाराची गरज आहे. त्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ वाढवा, असेही निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. क्वारंटाईन सेंटरमध्ये चांगले जेवण, वेळेवर औषधे दिली जात आहेत. ती माहिती लोकांपर्यंत गेली पाहिजे. तरच क्वारंटाईन सेंटरविषयीची लोकांच्या मनातील भीती दूर होईल. रूग्ण आणि नातेवाईक यांच्यामध्ये संवाद करून दिला जावा. त्यामुळे रूग्णाला मानसिक आधारही मिळेल. माणसांचा जीव महत्वाचा आहे असे सांगून प्रभाग समिती स्तरांवर नगरसेवक, स्वयंसेवी संस्था, सर्वपक्षीय पदाधिकारी यांच्या समित्या तयार करा, असेही आदेश त्यांनी यावेळी दिले. धारावीतही याच जैन संघटनेने ६० ते ७० हजार रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार केले. त्यामुळे ठाण्यातही नऊ प्रभाग समिती क्षेत्रात असे काम होणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. मृत्यू दर कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आदेश त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले.
* पीपीई किट घालून काम करणे कसे कठीण आहे, हे सांगून त्यांनी कोरोना योद्धा डॉक्टर आणि परिचारिका यांना प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे सांगितले.
राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ही महामारी मानवनिर्मित नाही. मानवनिर्मित असती आणि ती आटोक्यात आणली नसती तर प्रशासनाला दोष देता आला असता. पण सर्व यंत्रणा कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. मुंब्रा येथे आता रुग्णसंख्याही घटली असून मृत्यू दरही कमी झाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. असेच काम आपल्याला पुढच्या काळातही करायचे आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे कोणीही कोणावर केवळ दोषारोप करीत राहणे चुकीचे असल्याचा टोला त्यांनी स्वकीयांसह विरोधकांनाही हाणला. आंध्रप्रदेश येथील एक व्यक्ती १९०० रुपयांमध्ये कोरोनाची चाचणी करण्यास तयार आहे. केवळ त्याला जागा द्यायची असल्याचे ते म्हणाले.
* यावेळी महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी कोरोना बाधितांची संख्या वाढली तरी आमचे कोरोनावरील नियंत्रण सुटलेले नाही. आपण चाचणीचे प्रमाण वाढविले आहे. त्यामुळे वाढलेल्या रुग्णसंख्येपैकी ८० टक्के बाधित रूग्ण हे सिमटोमॅटीक आहेत. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रारंभी, भारतीय जैन संघटनेचे धर्मेश जैन यांनी प्रास्ताविक केल्यानंतर दिपक गरोडिया यांनी या मोहिमेविषयीची माहिती सांगितली. तर नैनेश शहा यांनी आभार मानले.
* ‘मिशन झिरो’ही मोहीम भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुठा यांच्या मार्गदर्शनाखाली ‘देश अपनाये’ ही स्वयंसेवी संस्था, एमसीएचआय क्रेडाई आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त प्रयत्नांतून चालविण्यात येणार आहे. यापूर्वी या संघटनांच्या माध्यमातून मुंबई, पुणे, मालेगाव आणि नाशिक या शहरांबरोबरच गुजराथ आणि कर्नाटक याठिकाणी देखिल चांगले काम केले आहे. या मोहिमेंतर्गत नऊ मोबाईल डिस्पेन्सरीज नऊ प्रभाग समित्यांमध्ये कार्यरत राहणार आहेत. त्यामाध्यमातून तापाचे तसेच कोरोना सदृश्य रूग्णांची तपासणी होेणार आहे. सोमवारी पालकमंत्र्यांनी या सर्व मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅनचे हिरवा झेंडा दाखवून उद्घघाटन केले.
* डॉक्टरसह सर्व आवश्यक कर्मचाऱ्यांचे पथक औषध साठयांसह प्रभागातील कंटेनमेंट झोन, हॉटस्पॉटसह परिसरातील नागरीकांची तपासणी करणार आहे. त्यादरम्यान एखादा संशयित रुग्ण आढळल्यास त्याची स्वॅब तपासणी करून त्याचा अहवाल तातडीने दिला जाणार आहे. त्याच्या अहवालाच्या अनुषंगाने आवश्यकतेनुसार रुग्णाला क्वारंटाईन किंवा हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठीही पथक हालचाली करणार आहे. या मोहिमेमुळे नागरीकांना स्वॅब तपासणीसाठी लॅबमध्ये जाण्याची गरज भासणार नसून वेळीच उपचार मिळाल्यामुळे कोरोनाचा प्रसार थांबविणे शक्य होणार आहे.

 

Web Title: Coronavirus News: Target to reduce coronavirus death: Guardian Minister orders administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.