Coronavirus News: ठाणे आयुक्तालयात २४ तासांमध्ये आणखी ३७ पोलीस झाले कोरोना बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 12:26 AM2020-07-04T00:26:46+5:302020-07-04T00:31:04+5:30
गेल्या २४ तासांमध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात ३९ पोलीस कोरोनामुळे बाधित झाले. आतापर्यंत ५९ अधिकारी आणि ५३४ कर्मचारी असे ५९३ पोलीस बाधित झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: गुरुवारी एकाच दिवशी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात आतापर्यंत रेकॉर्डब्रेक ३९ पोलीस बाधित झाले असतांनाच सलग दुस-या दिवशीही तब्बल ३५ पोलीस कर्मचारी हे बाधित झाले. यामध्ये एकटया महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यातील सात कर्मचा-यांचा समावेश आहे. त्यामुळे बाधितांची संख्या ही तब्बल ५९३ च्या घरात गेल्याने पोलिसांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.
गेल्या काही दिवसापासून पोलिसांमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढत आहे. २ जुलै रोजी एकीकडे ठाणे शहर, कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगरमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आले. त्याचवेळी आयुक्तालयात एकाच वेळी ३९ पोलिसांना बाधा झाल्याचे आढळले. यात दोने अधिका-यांचाही समावेश होता. तर शुक्रवारी देखिल ३५ कर्मचारी बाधित झाले. यामध्ये चार महिला कर्मचा-यांचाही समावेश आहे. शुक्रवारी बाधितांमध्ये एमएफसीचे पोलीस ठाण्याचे सात, ठाणेनगरचे पाच, मानपाडा चार, नौपाडा आणि चितळसरचे प्रत्येकी तीन तर मुंब्रा, कळवा आणि शीघ्र कृती दलातील प्रत्येकी दोन पोलीस कर्मचाºयांचा समावेश आहे. याशिवाय, श्रीनगर, डायघर, खंडणी विरोधी पथक, भोईवाडा आणि शांतीनगर या पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एका पोलिसाचा यात समावेश आहे.
* आतापर्यंत ५९ अधिकारी आणि ५३४ कर्मचारी असे ५९३ पोलीस बाधित झाले आहेत. ३७ अधिकाºयांसह ३५३ कर्मचारी अशा ३९० पोलिसांनी कोरोनावर मात केल्याची माहिती सूत्रांनी दिली.