CoronaVirus News in Thane : कोरोनाबाधित रुग्णाचा रस्त्यावरच तडफडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 03:38 AM2020-05-21T03:38:09+5:302020-05-21T03:39:00+5:30
CoronaVirus News in Marathi and Live Updates : या ६० वर्षीय व्यक्तीला ताप येत होता. त्यामुळे त्याची सोमवारी कोरोना चाचणी करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी त्याला जास्त त्रास होऊ लागल्याने त्याच्या मुलीने त्यांना कळवा रुग्णालयात नेले.
ठाणे : ठाण्यातील वागळे इस्टेटच्या शिवाजीनगर भागात एका ६० वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा रस्त्यावर तडफडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रुग्णवाहिका त्याला घेण्यासाठी आली. मात्र, सोबत डॉक्टर वा वैद्यकीय कर्मचारी नव्हते. त्यामुळे पीपीई किटअभावी त्याला रुग्णवाहिकेत टाकण्यास कोणीही पुढे सरसावले नाही.
या ६० वर्षीय व्यक्तीला ताप येत होता. त्यामुळे त्याची सोमवारी कोरोना चाचणी करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी त्याला जास्त त्रास होऊ लागल्याने त्याच्या मुलीने त्यांना कळवा रुग्णालयात नेले. मात्र, जागा नसल्याचे सांगून आणि तापाचा रुग्ण दाखल करून घेत नसल्याचे कारण पुढे करून त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यास सांगितले. परंतु, तेथेही त्याला उपचारासाठी दाखल करून घेतले नाही. तापाच्या रुग्णाला आम्ही दाखल करून घेत नाही, आधी रिपोर्ट आणा मगच दाखल करतो, असे त्यांना सांगण्यात आले.
अखेर त्या मुलीने आपल्या पित्याला पुन्हा घरी नेले. त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास त्याला जास्तीचा त्रास होऊ लागला. त्यानंतर त्या मुलीने तेथील माजी स्थानिक नगरसेवकाला सांगून रुग्णवाहिका मागविली. तीदेखील चारच्या सुमारास दाखल झाली. तेव्हाच त्याचा रिपोर्टही आला. त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते.
परंतु, रुग्णवाहिकेत चालकाशिवाय डॉक्टर किंवा इतर कोणताही स्टाफ आला नव्हता. दोन तासांचा कालावधी निघून गेला आणि त्यातच त्या व्यक्तीचा तेथेच मृत्यू झाला.
मदतीसाठी कोणी नाही, बघ्यांची गर्दी
परिसरातील सुमारे १०० ते १५० नागरिक त्या रुग्णाची होणारी तडफड पाहत होते. त्याचा अहवाल हा पॉझिटिव्ह आल्याने कोणीही पुढे जाण्यास तयार होत नव्हता. बघ्यांनी गर्दी केली होती. तो तडफडत होता, त्याला खूप त्रास होत होता. परंतु, पीपीई किट नसल्याने कोणीही पुढे जाण्यास धजावत नव्हता. या घटनेला जबाबदार कोण असा सवाल मात्र या निमित्ताने उपस्थित झाला आहे.