CoronaVirus News in Thane : मृत्यूने माझा पाठलाग केला- रवींद्र फाटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 01:10 AM2020-05-22T01:10:13+5:302020-05-22T01:10:57+5:30
CoronaVirus News in Marathi and Live Updates : कोरोनाची लागण झाल्याने उपचाराकरिता इस्पितळात दाखल झालो तेव्हा तीन दिवस आजूबाजूला काय सुरू होते, याची थोडीही कल्पना नव्हती. देवाच्या कृपेमुळे, डॉक्टर, नर्सेस यांचे उपचार आणि स्ट्राँग विल पॉवर या बळावर मी कोरोनावर मात केली.
- अजित मांडके
ठाणे : मृत्यू पाठलाग करतो हे ऐकून होतो. मात्र त्याचा प्रत्यक्ष अनुभव गेल्या महिनाभरात घेतला. कोरोनाची लागण झाल्याने इस्पितळात दाखल होतो तेव्हा डॉक्टरांचे उपचार आणि मनोधैर्याच्या बळावर त्यातून बाहेर आलो. त्यानंतर होम क्वारंटाइन होण्याकरिता येऊर येथील निवासस्थानी गेलो तर साप चावला. त्यामुळे पुन्हा आयसीयूमध्ये दाखल झालो. पुन्हा तब्बल १६ दिवसांच्या उपचारानंतर घरी परतलो आहे, अशा शब्दांत शिवसेना आ. रवींद्र फाटक यांनी आपल्या भावना ‘लोकमत’कडे व्यक्त केल्या.
कोरोनाची लागण झाल्याने उपचाराकरिता इस्पितळात दाखल झालो तेव्हा तीन दिवस आजूबाजूला काय सुरू होते, याची थोडीही कल्पना नव्हती. देवाच्या कृपेमुळे, डॉक्टर, नर्सेस यांचे उपचार आणि स्ट्राँग विल पॉवर या बळावर मी कोरोनावर मात केली. १४ दिवस रुग्णालयात काढल्यावर घरी आलो. येऊर येथील निवासस्थानी विश्रांती व क्वारंटाइन होण्याकरिता गेलो होतो. बाथरूममध्ये गेलो तोच साप चावला. पुन्हा मला रुग्णालयातील आयसीयूमध्ये दोन दिवस ठेवले होते. माझी दोन्ही मुले घरात रडत होती. परंतु तब्बल १६ दिवसांनंतर गुरुवारी घरी परतलो आहे, असे फाटक म्हणाले. मृत्यू पाठलाग करतो याचा मी शब्दश: अनुभव घेतला व सुदैवाने मृत्यूला चकवले आहे, असेही ते म्हणाले.
फाटक म्हणाले की, सुरुवातीला माझ्या पत्नीला कोरोनाची लागण झाली. तिला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर एक आठवड्याने मलादेखील ताप आणि थकवा जाणवू लागला. त्यामुळे मी तिसऱ्यांदा कोरोनाची चाचणी केली. सुरुवातीच्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह होत्या. परंतु तिसरी चाचणी पॉझिटिव्ह आली. अगोदर पत्नी रुग्णालयात कोरोनाशी झुंज देत असताना मलाही कोरोनाची लागण झाल्याने पायाखालची वाळूच सरकली. मुंबईतील खाजगी रुग्णालयात मला दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी तीन दिवस मी आयसीयूमध्ये होता. तीन दिवसांनंतर प्रकृतीमध्ये सुधारणा झाली. मी आणि माझी पत्नी दोघेही एकाचवेळी रुग्णालयात असल्याने घरी दोन्ही मुले एकटीच होती. मोठ्या मुलाने मला व्हिडीओ कॉल करून धीर देण्याचा प्रयत्न केला. परंतु दोघेही सारखे रडत होते. तेवढ्यात आमच्या गाडीच्या चालकाला कोरोनाची लागण झाली आणि त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची वार्ता कानावर आली आणि आम्हाला धक्का बसला. माझ्या पत्नीला मधुमेह असल्याने तिच्या प्रकृतीची मला सतत काळजी वाटत होती. भलतेसलते विचार मनात येत होते. परंतु आम्ही दोघांनी कोरोनाशी सुरू असलेले युद्ध जिंकले. इस्पितळातील ते १४ दिवस मला १४ वर्षे वनवासात काढल्यासारखे वाटत होते. या कालावधीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेकांनी माझी विचारपूस केली. सुदैवाने दोन्ही मुलांच्या लागोपाठ दोन टेस्टचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने मला समाधान वाटले.
- बाथरूममध्ये साप चावला तेव्हा तो विषारी की बिनविषारी या कल्पनेनी मी गर्भगळीत झालो. छातीत अक्षरश: धडकी भरली. पुन्हा, दोन दिवस आयसीयूमध्ये दाखल होतो. तेव्हा तर मी जगण्याची इच्छा सोडली होती. मृत्यू आपली पाठ सोडायला तयार नाही, अशीच माझी धारणा झाली. परंतु देवाच्या कृपेने या संकटावरदेखील मी मात केली आणि गुरुवारीच घरी सुखरूप परतलो आहे.