CoronaVirus News in Thane : जिल्हा कोविड रुग्णालय ठरतेय पॉझिटिव्ह गरोदर महिलांचे माहेरघर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 11:48 PM2020-05-20T23:48:17+5:302020-05-20T23:48:52+5:30
CoronaVirus News in Marathi and Live Updates : आतापर्यंत रुग्णालयात तीन महिलांच्या प्रसूती करण्यात तेथील डॉक्टरांना यश झाले आहे. तर, आणखी पॉझिटिव्ह आलेल्या अकरा गरोदर महिला असून त्यांच्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे.
- पंकज रोडेकर
ठाणे : ठाणे जिल्हा सामान्य (कोविड) रुग्णालय कोविड पॉझिटिव्ह रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. कोरोना पॉझिटिव्ह गरोदर महिलांसाठी ते जणू हक्काचे माहेरघरच ठरत आहे. आतापर्यंत रुग्णालयात तीन महिलांच्या प्रसूती करण्यात तेथील डॉक्टरांना यश झाले आहे. तर, आणखी पॉझिटिव्ह आलेल्या अकरा गरोदर महिला असून त्यांच्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. तर आतापर्यंत प्रसूती झालेल्या तिघींपैकी दोघी कोरोनाला हरवून आपल्या तान्हुल्यांसह त्या घरी परतल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. आनंदाची बाब म्हणजे तिघींच्या बाळांचा रिपोर्ट निगेटिव्ह आलेला आहे.
सामान्य रुग्णालयाची जिल्हा कोविड रुग्णालय म्हणून घोषणा झाली. त्याचवेळी भविष्यात वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन कोरोनाबाधितांमध्ये एखाद्या गरोदर महिलेची प्रसूती करण्याची वेळ आल्यावर तिच्या प्रसूतीसाठी शस्त्रकियेसह नॉर्मल प्रसूतीची चोख व्यवस्था केली. त्याचबरोबर नवजात बाळाला आवश्यक असलेला 'एसएनसीयू' विभागदेखील तयार केला. तर कोरोना झालेला रुग्ण किडनीच्या आजाराने त्रस्त असल्यास त्यासाठी डायलेसिस विभागही सुरू केला.
या रुग्णालयात दाखल गरोदर महिलेची पहिली प्रसूती ही सिझर झाली. कल्याणच्या या गर्भवतीने मुलीला जन्म दिला. त्यानंतर अवघ्या दोन ते तीन दिवसांनी रुग्णालयात दाखल झालेल्या ठाण्यातील महिलेची नॉर्मल प्रसूती झाली. तिला मुलगा झाला. त्यानंतर सीझर झालेल्या तिसऱ्या महिलेनेही मुलाला जन्म दिला. यामधील पहिल्या दोन्ही बाळंतिणी कोरोनामुक्त होऊन तान्हुल्यांसह घरी परतल्या आहेत. तर एका बाळंतिणीासोबत एका खाजगी रुग्णालयात प्रसूत झालेल्या अन्य महिलेवरही आता जिल्हा कोविड रुग्णालयातच उपचार सुरू आहेत.
सध्या दाखल कोविड पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये १५ गर्भवती महिलाही आहेत. यामध्ये मुंब्य्रातील सर्वाधिक ७ तसेच ठाणे शहरातील ३ महिला असून त्यातील दोघांची प्रसूती झाली. तर कल्याण- डोंबिवलीतील दोघी असून त्यातील एकीची प्रसूती बाकी आहे. तसेच मुंबईच्या पवईतील महिलेची खाजगी रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर संबधित महिलेची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर तिला जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल केल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
एक महिला आहे सहा महिन्यांची गरोदर...
कोविड पॉझिटिव्ह आढळल्यावर ११ जणींना उपचारार्थ दाखल केले असून सद्य:स्थितीत त्या प्रसूतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातील एक महिला सहा महिन्यांची गरोदर आहे. तर, उर्वरित १० जणींचे नऊ महिने जवळपास पूर्ण झाले असून त्यांची प्रसूती येत्या काही दिवसांत होईल, असे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.
विशेष वॉर्डची व्यवस्था
गरोदर आणि बाळंतिणींसाठी जिल्हा कोविड रुग्णालयात विशेष वॉर्ड तयार करून गरोदर महिलांच्या प्रसूतीसाठी डॉ. अर्चना आखाडे आणि डॉ. स्वाती पाटील या दोन स्त्रीरोगतज्ज्ञांची नियुक्ती केली आहे. या गरोदर महिलांवर ड्युटीवर असलेला वैद्यकीय स्टाफ लक्ष ठेवून आहे.
विशेष स्टाफसाठी प्रयत्न
गरोदर महिलांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यांच्यासाठी विशेष स्टाफची गरज आहे. तो मिळण्यासाठी प्रयत्न सुरू असून लवकरच मिळेल, असा विश्वास रुग्णालयाने व्यक्त केला.
कोरोना रुग्णांमध्ये गरोदर महिलांचे प्रमाण वाढत आहे. त्यांच्या प्रसूतीसाठी विशेष विभागही सुरू केला आहे. आतापर्यंत दाखल झालेल्या रुणांमध्ये १४ गरोदर महिला आहेत. आतापर्यंत तिघींची प्रसूती झाली असून उर्वरित महिलांची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.
- डॉ. कैलाश पवार,
जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे रुग्णालय