Coronavirus News: कोरोनावर मात केल्यानंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त ड्यूटीवर हजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 10:57 PM2020-09-28T22:57:25+5:302020-09-28T23:01:42+5:30
कोरोनावर मात केल्यानंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त कोविड योद्धा विवेक फणसळकर हे सोमवारी पुन्हा ड्यूटीवर हजर झाले. त्यावेळी पुष्पवृष्टी करीत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचे जल्लोषात कार्यालयात स्वागत केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कोरोनावर मात केल्यानंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर हे सोमवारी पुन्हा ड्यूटीवर हजर झाले. त्यावेळी पुष्पवृष्टी करीत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचे जल्लोषात कार्यालयात स्वागत केले. यावेळी मुख्यालयाच्या राखीप पोलीस निरीक्षकांनी बँन्डच्या तालावर त्यांना शानदार सलामी दिली.
कोरोनामुळे जिल्हाभर लॉकडाऊन सुरु असतांना त्यासाठी बंदोबस्तावर असलेल्या ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील दीड हजारांहून अधिक पोलीस कोरोनामुळे बाधित झाले. या सर्वच कर्मचाºयांची वैयक्तिकरित्या काळजी घेणारे ठाण्याचे पोलीस आयुक्त फणसळकर हेही ६ सप्टेंबर रोजी कोरोनामुळे बाधित झाले. त्यांना मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केल्यानंतर त्यांना १६ सप्टेंबर रोजी रु ग्णालयातून घरी सोडण्यात आले. काही दिवसाच्या विश्रांतीनंतर सोमवारी फणसळकर कार्यालयात रुजू झाले. सह पोलीस आयुक्त डॉ. सुरेश मेकला, अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय येनपुरे (प्रशासन), प्रविण पवार (गुन्हे), अनिल कुंभारे (पश्चिम प्रादेशिक विभाग), दत्ता कराळे (पूर्व प्रादेशिक विभाग) यांच्यासह उपायुक्त प्रियंका नारनवरे, बाळासाहेब पाटील, दीपक देवराज, संजय जाधव, सुभाष बुरसे आणि रिडर अजय घोसाळकर यांनी त्यांचे स्वागत केले. पोलीस आयुक्तालय कार्यालयात त्यांचे आगमन झाल्यानंतर मुख्यालयाचे राखीव पोलीस निरीक्षक सुभाष माने यांनी त्यांना बँडच्या तालावर शानदार सलामी दिली. त्यानंतर पुष्पवृष्टी करीत पोलीस अधिकारी आणि कर्मचा-यांनी त्यांचे स्वागत केले.
* लागलीच कामाचा धडाका
आयुक्तांनी सकाळी ११.३० वाजता सह आयुक्त मेकला यांच्याकडून पुन्हा सूत्रे घेतल्यानंतर त्यांनी विशेष शाखेचे पोलीस आयुक्त बाळासाहेब पाटील, गुन्हे शाखेचे उपायुक्त दीपक देवराज यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाºयांसमवेत बैठक घेतली. त्याचवेळी गेल्या महिनाभरातील गुन्हेगारीचाही त्यांनी आढावा घेतला. पोलिसांनी कोरोना नियंत्रणासाठी बंदोबस्त करतांना स्वत:चीही काळजी घेतली पाहिजे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.