CoronaVirus News: कंटेनमेंट झोन सील करणार, लॉकडाऊनवर शोधला पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 12:22 AM2020-06-27T00:22:56+5:302020-06-27T00:23:01+5:30
लॉकडाऊनच्या मागणीस नागरिकांचा वाढता विरोध पाहता महापालिका प्रशासनाने मध्यम मार्ग काढत कंटेनमेंट झोन सील करण्याची मात्रा शोधली आहे.
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र, लॉकडाऊनच्या मागणीस नागरिकांचा वाढता विरोध पाहता महापालिका प्रशासनाने मध्यम मार्ग काढत कंटेनमेंट झोन सील करण्याची मात्रा शोधली आहे. त्यानुसार, शनिवारपासून कोरोनाचे रुग्ण ज्या प्रभागांमध्ये वाढताहेत, अशा जवळपास ३३ प्रभागांमधील कंटेनमेंट झोन सील करण्यात येणार आहेत. या निर्णयाची कठोर अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.
महापालिका हद्दीत शुक्रवारी कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४८७३ झाली होती. गुरुवारी एकाच दिवसात कोरोनाचे ३२३ नवे रुग्ण आढळले आहेत. रुग्णांची वाढती संख्या पाहता पुन्हा एकदा १५ दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्याची मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली होती. या मागणीला अन्य आमदारांनी पाठिंबा दिला होता. मात्र, हा निर्णय आयुक्तांच्या पातळीवर घेतला जाईल, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. पालकमंत्र्यांची बैठक २0 जून रोजी झाली. अनलॉक-१ मध्ये पुन्हा जनजीवन सुरळीत होत असताना पुन्हा लॉकडाऊन करणे शक्य नाही. लॉकडाऊन करता येत नसले, तरी वाढत्या रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. लॉकडाऊन करण्यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागते. महापालिका हद्दीत सुरुवातीला डोंबिवलीत जास्त रुग्ण आढळून येत होते. आता डोंबिवलीला कल्याणने मागे टाकले. कल्याणमध्ये पश्चिमेत जास्त रुग्ण आढळून येत आहे. आतापर्यंत कोरोनामुळे ९६ जणांचा मृत्यू झाला आहे. ही परिस्थिती गंभीर आहे. त्यात महापालिकेची आरोग्य यंत्रणा अपुरी असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. या सर्व पार्श्वभूमीवर आयुक्तांनी महापालिका हद्दीत ज्या ठिकाणी कोरोनाचे जास्त रुग्ण आढळत आहेत, ते कंटेनमेंट झोन सील करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची यादी प्रभाग अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. महापालिका हद्दीत आजमितीस ११७ कंटेनमेंट झोन आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात रुग्ण जास्त असलेल्या ३३ प्रभागांमधील कंटेनमेंट झोन सील करण्यात येणार आहेत.
>राज्य राखीव पोलिसांची मदत घेणार
कंटेनमेंट झोन सील केल्यानंतर तेथील परिस्थितीवर नजर ठेवण्यासाठी राज्य राखीव पोलिसांची मदत घेतली जाणार आहे. राज्य राखीव पोलीस मागविण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी पोलीस प्रशासनावर सोडला आहे. राज्य राखीव पोलीस मागविण्यात येणार आहेत, याला पोलिसांनी दुजोरा दिला आहे.
>या प्रभागांतील झोन होणार सील
मांडा पूर्व, पश्चिम, मोहने गावठाण, गौरीपाडा, चिखलेबाग, गोविंदवाडी, रोहिदासवाडा, जोशीबाग, हनुमाननगर, दुर्गानगर, विजयनगर, तीसगाव गावठाण, कोळसेवाडी, चिकणीपाडा, जरीमरीनगर, गणोशवाडी, आनंदवाडी, शिवाजीनगर, चोळेगाव, शिवमार्केट, सावरकर रोड, सारस्वत कॉलनी, रामनगर, म्हात्रेनगर, सुनीलनगर, तुकारामनगर, आनंदनगर, ठाकूरवाडी, नवागाव, कोपर रोड, नांदिवली पंचानंद या प्रभागांमध्ये असलेले कंटेनमेंट झोन सील केले जाणार आहेत. या झोनमध्ये सकाळी ५ ते ९ या वेळेत दूध मिळू शकणार आहे. याशिवाय, सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत किराणा दुकाने होम डिलिव्हरीसाठी सुरू राहतील.
सील करण्यात आलेल्या कंटेनमेंट झोनमधून येजा करता येणार नाही. यापूर्वीही कंटेनमेंट झोनमधून येजा करण्यास मनाई होती. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी झोनमध्ये एकच एण्ट्री पॉइंट ठेवला होता. त्याठिकाणी होमगार्ड व पोलीस तैनात करण्यात आले होते.