coronavirus: ठाणे जिल्ह्यात साडेनऊ हजार संशयितांचे अहवाल निगेटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 02:25 AM2020-05-14T02:25:59+5:302020-05-14T02:27:00+5:30
ठाणे जिल्ह्यात मार्चच्या १३ तारखेला पहिला रुग्ण मिळून आला होता. त्यानंतर, कोरोनाचा संसर्ग एप्रिल शेवटपर्यंत वाढत होता.
ठाणे : कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात दिवसेंदिवस पसरत आहे. मात्र, स्वॅब घेतलेल्या जिल्ह्यातील २१ हजारांहून संशयितांपैकी साडेनऊ हजारांहून अधिक नागरिकांचा अहवाल निगेटिव्ह असल्याची दिलासादायक बाब पुढे आली आहे. ही संख्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या तीनपट आहे. तर, २५४८ नागरिकांना आतापर्यंत लागण झाली असून ७२० अधिक रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे. १६१३ रुग्ण सद्य:स्थितीत जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असून २३२५ रुग्ण तपासणी अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत.
ठाणे जिल्ह्यात मार्चच्या १३ तारखेला पहिला रुग्ण मिळून आला होता. त्यानंतर, कोरोनाचा संसर्ग एप्रिल शेवटपर्यंत वाढत होता. १ मे रोजी जिल्ह्याने एक हजारांचा टप्पा ओलांडला. त्यानंतर, कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढल्याने अवघ्या नऊ दिवसांत त्यामध्ये आणखी एक हजार रुग्णांची भर पडल्याने ती संख्या दोन हजार झाली होती. त्यानंतर, तीन दिवसांत रुग्णसंख्या ५०० ने वाढल्याचे आकडेवारीवरून पाहण्यास मिळाले आहे.
जिल्ह्यात १३ मार्च ते १२ मे दरम्यान २१ हजार १९४ जणांचे स्वॅब घेण्यात आले. यामध्ये सर्वाधिक आठ हजार १५५ स्वॅब हे ठामपा हद्दीतील संशयितांचे घेतले गेले आहेत. त्यापाठोपाठ नवी मुंबईत सहा हजार ९३६, केडीएमसीत एक हजार ७६८, मीरा भार्इंदर-१५४४, भिवंडी-१३५५, उल्हासनगर-६७०, ठाणे ग्रामीण-२९०, बदलापूर-२४२ आणि सर्वात कमी अंबरनाथ येथील २३४ इतके आहेत. या घेतलेल्या स्वॅबमध्ये ८५६ सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण हे नवी मुंबई येथील आहेत. त्यापाठोपाठ ठामपा ७९७, तर सर्वात कमी १६ रुग्णसंख्या ही अंबरनाथ येथील आहेत.
21,194 स्वॅब
2325 रु ग्णांचे अहवाल प्रतीक्षेत
नवी मुंबई आघाडीवर : निगेटिव्ह अहवालामध्येही नवी मुंबईने आघाडी घेतली आहे. त्याच्या खालोखाल ठामपा आहे. अंबरनाथने आपला सर्वात कमी संख्येचा आकडा कायम ठेवला आहे. तर, दुसरीकडे तपासणी अहवालाच्या प्रतीक्षेत असलेल्या २३२५ रु ग्णांपैकी नवी मुंबई एक नंबरला आहे. त्यापाठोपाठ ठामपा आहे. सर्वात कमी शून्य रुग्ण हे ठाणे ग्रामीणमधील असल्याची माहिती जिल्हा रु ग्णालय प्रशासनाने दिली.