CoronaVirus: नऊ हजार पोलिसांची फिरत्या डिस्पेन्सरीद्वारे होणार तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 12:42 AM2020-06-26T00:42:15+5:302020-06-26T00:42:20+5:30
सर्व ३५ पोलीस ठाण्यांमधील कर्मचाऱ्यांची तपासणी केली जाणार असून ज्यांना कोरोनासदृश लक्षणे असतील, त्यांची तातडीने तपासणी करून उपचारासाठी दाखल केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे : फिरत्या डिस्पेन्सरीद्वारे (फिरते रुग्णालय) ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील नऊ हजार पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची मोफत तपासणी मोहीम एक आठवडाभर राबविली जाणार आहे. यामध्ये सर्व ३५ पोलीस ठाण्यांमधील कर्मचाऱ्यांची तपासणी केली जाणार असून ज्यांना कोरोनासदृश लक्षणे असतील, त्यांची तातडीने तपासणी करून उपचारासाठी दाखल केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या मोहिमेचा शुभारंभ पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते २६ जून रोजी सकाळी ११ वाजता ठाणे पोलीस आयुक्त कार्यालय येथे होत आहे. आतापर्यंत ३८६ पेक्षा अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून, तीन पोलिसांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर भारतीय जैन संघाचे धर्मेश जैन, बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई आणि एमसीएचआय या दोन संघटनांच्या सहकार्यातून ही तपासणी मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय येनपुरे यांनी दिली.
एका व्हॅनमधून डॉक्टरांच्या दोन पथकांद्वारे ठाणे, वागळे इस्टेट, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि या पाचही परिमंडळांमधील ३५ पोलीस ठाण्यांमधील पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांची तपासणी केली जाणार आहे. ज्यांना ताप, सर्दी, खोकला आणि इतर आजार असतील, त्यांच्यावर औषधोपचार केले जाणार आहे. पण, ज्यांना घसा खवखवणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि ताप येणे, अशी लक्षणे असणाºयांची कोरोनाचीही मोफत तपासणी केली जाणार आहे.
२६ जूनपासून या उपक्रमाला औपचारिकरीत्या सुरुवात होणार असली, तरी सध्या कोपरी आणि नौपाडा या दोन पोलीस ठाण्यांमधील पोलिसांची तपासणी करण्यात आली आहे. नऊ हजार कर्मचाºयांबरोबरच ८०० अधिकारी, राज्य राखीव पोलीस दल, केंद्रीय शीघ्र कृती दल आणि गृहरक्षक दलाच्याही जवानांची तपासणी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
>कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस कर्मचारी हे बंदोबस्ताबरोबर अनेक वेगवेगळी कर्तव्ये बजावत आहेत. यातच अनेकांना कोरोनाची लागण झाली. त्याच पार्श्वभूमीवर लक्षणे येण्याआधीच सर्वच पोलिसांची सामाजिक संस्थांच्या मदतीने ही मोफत आरोग्यतपासणी केली जाणार आहे. वेळेत निदान होऊन उपचार मिळाल्याने कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्याचाच फायदा या तपासणीतून पोलिसांना होऊ शकतो.
- संजय येनपुरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त, प्रशासन, ठाणे शहर