coronavirus:हाताला काम नाही, खायलाही पैसे नाहीत! मुंबईत राहून करणार काय? पायी गाव गाठणाऱ्या मजुरांची उद्विग्नता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 02:28 AM2020-05-11T02:28:29+5:302020-05-11T02:29:11+5:30

मुंबईतील शेकडो मजूर मिळेल त्या वाहनाने किंवा गटा- गटाने पायीच परराज्यातील गाव गाठण्यासाठी प्रवास करीत आहेत. मुंबई ते उत्तर प्रदेश या सुमारे १५०० किलोमीटरच्या प्रवासाला किती काळ लागेल, हे माहिती नाही.

coronavirus: No work, no money to eat! Will you stay in Mumbai? Anxiety of laborers reaching the village on foot | coronavirus:हाताला काम नाही, खायलाही पैसे नाहीत! मुंबईत राहून करणार काय? पायी गाव गाठणाऱ्या मजुरांची उद्विग्नता

coronavirus:हाताला काम नाही, खायलाही पैसे नाहीत! मुंबईत राहून करणार काय? पायी गाव गाठणाऱ्या मजुरांची उद्विग्नता

Next

- जितेंद्र कालेकर  
ठाणे -  हाताला काम नाही आणि दोन वेळचे खायलाही पैसे नाहीत... मग मुंबईत राहून करायचे काय? यदाकदाचित कोरोनासारखा आजार झालाच तर निदान आमच्या कुटुंबासमोर गावी मरण आले तरी चालेल, अशी उद्वीग्नता मुंबईतून ठाणेमार्गे पायीच उत्तरप्रदेशातील गाव गाठण्यासाठी निघालेल्या एका गटाने ‘लोकमत’जवळ शनिवारी रात्री व्यक्त केली.
मुंबईतील शेकडो मजूर मिळेल त्या वाहनाने किंवा गटा- गटाने पायीच परराज्यातील गाव गाठण्यासाठी प्रवास करीत आहेत. मुंबई ते उत्तर प्रदेश या सुमारे १५०० किलोमीटरच्या प्रवासाला किती काळ लागेल, हे माहिती नाही. पण, इथे होणाºया हालअपेष्टांपेक्षा पायी जाऊन, थोडे हाल आणखी सोसून आपले मूळ गाव गाठू, असे या मजुरांचे म्हणणे आहे. लिफ्टच्या फिटिंगचे काम करणारा राजू गौतम (२४, रा. मानखूर्द, मुंबई) हा त्यांच्यापैकीच एक. त्याचाच आणखी एक नातलग कप्तान गौतम (२४) हा पत्नी आशादेवी (२२) तसेच संध्या (३) आणि अंशू (२) ही दोन मुले आणि मनिषकुमार (२२) या भावासह हा प्रवास करीत आहेत. कोरोनाच्या संचारबंदीमुळे हाताला काम नाही. त्यात जवळचे सर्व पैसे संपले आहेत. काम शोधण्यासाठी बाहेर पडलो, तर पोलिसांचा मार खावा लागला, राजू आपली कैफियत मांडत होता. संसर्ग झालाच तर इथे मरण्यापेक्षा, तिकडे जाऊन आजाराशी लढा देत कुटूंबियांजवळ मरण आले तरी चालेल, असे मत कप्तान याने व्यक्त केले.
एक दोन किलोचे धान्य सुरुवातीला काही दिवस काही सामाजिक संस्थांकडून मिळाले, पण त्यावरही किती दिवस काढणार? असाही प्रश्न आहे. गावीच काहीतरी कामधंदा करु, अशी भावना या कुटुंबियांनी व्यक्त केली.
ठाण्याच्या कॅडबरी जंक्शन मार्गावरुन नाशिकच्या दिशेने जाणाºया आणखी एका गटातील फुले रावत (२६, रा. रे रोड, मुळ रा. इटावा, उत्तर प्रदेश) म्हणाला, गेल्या दहा वर्षांपासून मुंबईत राहतो.
मुंबईत कपड्याच्या मार्केटींगचे तो काम करतो. दोन महिने गावाहून पैसे मागवून आणि कर्ज काढून दिवस काढले. आता मिळकत काहीच नाही. मग जगणार कसे, असा त्याचा प्रश्न आहे. सूरजकुमार (३५, रा. दारुखाना, मुंबई, मूळ गोंडा (उत्तरप्रदेश) हा दहा वर्षांपासून टॅक्सी चालवितो. तो ७ मेपासून पायीच घराबाहेर पडला.

सूरजकुमार तिवारी याच्यासह रामसुरेश तिवारी, उमाकांत तिवारी, रामदेव शुक्ला, हणमंतलाल तिवारी, शिवनाथ तिवारी अशा सहा जणांच्या गटाने प्रवास करीत आहेत.

रोज १५ ते २० किलोमीटर प्रवासानंतर थोडी विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा मार्गस्थ व्हायचे, असा त्यांचा दिनक्रम आहे. केंद्र आणि राज्य शासनाने किमान लहान मुले, महिला आणि अपंग यांच्याकडे पाहून तरी आमच्या घरी जाण्यासाठी सुटसुटीत नियम करावेत.

रीतसर गावी जाण्यासाठी शिवडी पोलिसांकडेही अर्ज केला. पण, जाचक नियमांमुळे काही उपयोग झाला नाही. उत्तर प्रदेशच्या योगी सरकारनेही या मजुरांना विनाअट स्वीकारले पाहिजे, अशीही माफक अपेक्षा या मजुरांनी व्यक्त केली आहे.

Web Title: coronavirus: No work, no money to eat! Will you stay in Mumbai? Anxiety of laborers reaching the village on foot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.