coronavirus: कोरोनाबाधितांची संख्या वाढली, मीरा भाईंदरमध्ये 1 ते 10 जुलैदरम्यान पुन्हा होणार लॉकडाऊन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 04:54 PM2020-06-30T16:54:34+5:302020-06-30T16:55:49+5:30
लॉकडाऊनमध्ये सवलत देण्यास सुरुवात केल्यापासून लोकांची गर्दी आणि वर्दळ वाढली आहे . त्यातच बेकायदेशीर बाजार भरणे सुरूच आहे.
मीरारोड - मीरा भाईंदर मध्ये कोरोनाचे रोजचे वाढते रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण पाहता अखेर महापालिका आयुक्त डॉ . विजय राठोड यांनी 1 जुलै पासून 10 जुलै पर्यंत शहरात पुन्हा लॉक डाऊन जाहीर केले आहे . तर भाईंदर पूर्वेला नवघर पोलिसांनी आज मंगळवारीच दुकाने बंद करायला लावली .
लॉकडाऊनमध्ये सवलत देण्यास सुरुवात केल्यापासून लोकांची गर्दी आणि वर्दळ वाढली आहे . त्यातच बेकायदेशीर बाजार भरणे सुरूच आहे . व्यायामाच्या नावाखाली लोकं मॉर्निग वॉक ला लांब जात आहेत . बाहेर कारण नसताना फिरणारे देखील कमी नाहीत . त्यातच मास्क न लावणे , सोशल डिस्टंसिंग न पाळणे हे नित्याचेच झालेले आहे .
परिणामी शहरात सोमवार पर्यंत 3 हजार 165 कोरोना रुग्ण तर 142 जणांचा मृत्यू झालेला आहे . रोजचे शंभर वा दीडशे च्या घरात सापडणारे कोरोनाचे रुग्ण आणि रोज जाणारे तीन ते सहा जणांचे बळी या मुळे लोकां मध्ये भीतीचे वातावरण आहे . परंतु अनेक बेजबाबदार लोक मात्र कोरोना संसर्ग बाबत खबरदारी घेत नसल्याने त्यांच्या मुळे अन्य लोकांना देखील धोका निर्माण झाला आहे .
कोरोनाची वाढती संख्या आणि मृत्यूचे प्रमाण तसेच निर्देशांचे होणारे उल्लंघन पाहता लॉक डाऊनचा निर्णय घेण्याची मागणी होत होती . आयुक्तांनी देखील 1 जुलैच्या सायंकाळी 5 वाजल्या पासून 10 जुलैच्या रात्री 12 वाजे पर्यंत लॉक डाऊन जाहीर केले आहे . त्यामुळे नागरिकांना अत्यावश्यक कारणां साठीच बाहेर पडता येणार आहे .
आयुक्त यांनी जारी केलेल्या आदेशात अन्नधान्य दुकाने, बेकरी, भाज्या, फळे, चिकन - मटण, मासे, अंडी आदींची दुकान व बाजारातून विक्री यावर बंदी घातली आहे . परंतु सदर जीवनावश्यक वस्तूंची या दरम्यान सकाळी 9 ते रात्नी 11 पर्यंत घरपोच सुविधा सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे .
दुधाची डेअरी सकाळी 5 ते सकाळी 10 वाजेपर्यंत तर पिठाच्या गिरण्या व औषध दुकाने नियमित वेळेत सुरु राहतील. बाकी सर्व दुकाने - व्यवसाय व उद्योग बंद राहणार आहेत . कॉल सेंटर व खाजगी कार्यालय 10 टक्के कर्मचारी ठेऊन सुरु ठेवता येतील . हॉटेल व वाईन शॉप मधून पार्सल सेवा सुरु राहणार आहे . परवानगी प्राप्त बांधकाम चालू ठेवता येणार आहेत . लॉकडाऊन व जनता कर्फ्यूचे उल्लंघन तसेच अनावश्यक बाहेर फिरणाऱ्यांना बंदी असून बाहेर मास्क व सोशल डिस्टंसिंग चे पालन न करणाऱ्यांवर देखील थेट गुन्हा दाखल होणार आहे