coronavirus: ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या २००६, शनिवारी तिघांचा मृत्यू, नव्या १८४ रुग्णांची पडली भर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 06:26 AM2020-05-10T06:26:20+5:302020-05-10T06:26:35+5:30
मागील चोवीस तासात नवी मुंबईत सर्वाधिक ६५ नवे रुग्ण आढळून आले असून भिवंडीत एकही नवा रुग्ण आढळला नाही. कल्याण- डोंबिवली महापालिका हद्दीतील रुग्णांची संख्या ३०० पेक्षा जास्त झाल्याची माहिती ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २००६ झाली असून शनिवारी नव्या १८४ रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच तिघांच्या मृत्यूमुळे मृतांची संख्या ४९ झाली आहे. मागील चोवीस तासात नवी मुंबईत सर्वाधिक ६५ नवे रुग्ण आढळून आले असून भिवंडीत एकही नवा रुग्ण आढळला नाही. कल्याण- डोंबिवली महापालिका हद्दीतील रुग्णांची संख्या ३०० पेक्षा जास्त झाल्याची माहिती ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.
शनिवारी नवी मुंबई महापालिका क्षेत्रात सर्वाधिक ६५ रुग्ण आढळल्याने येथील रुग्णांची संख्या ५९२ झाली आहे. तसेच नवी मुंबईत आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने तेथील मृतांची संख्या १२ झाली. ठाणे महापालिका हद्दीत नव्या ६० रुग्णांमुळे तेथील एकूण रुग्णसंख्या ६७१ झाली आहे. कल्याण- डोंबिवलीतही २५ नवे रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णसंख्या ३०५ झाली आहे. यामध्ये १४ रुग्ण डोंबिवलीत आणि १० रुग्ण कल्याण येथील आहेत. त्यातच एकाचा मृत्यू झाल्याने केडीएमसी क्षेत्रातील मृतांची संख्या चार झाली आहे. मीराभार्इंदर येथे नव्या सात रुग्णांची नोंद झाल्याने रुग्ण संख्या २४२ झाली आहे.
उल्हासनगर येथे नवे १६ रुग्ण आढळून आल्याने रुग्णसंख्या ३४ झाली आहे. ठाणे ग्रामीण आणि बदलापूर येथे प्रत्येकी पाच नवे रुग्ण सापडले आहेत. तेथील रुग्णसंख्या अनुक्रमे ७७ आणि ५१ इतकी झाली आहे. एक नवीन रुग्ण अंबरनाथ येथे नोंदवल्याने तेथील रुग्ण संख्या १३ झाली आहे.
भिवंडीत एकही नवीन रुग्ण न सापडल्याने तेथील रुग्णसंख्या २१ वर स्थिर राहिला. येथील परिस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
आव्हाड यांची प्रकृती स्थिर, आणखी एका आमदाराला लागण
राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांची प्रकृती आता स्थिर झाली असून ठाण्यातील शिवसेनेच्या एका आमदाराला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. काही दिवसांपूर्वी या आमदाराच्या पत्नीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे या आमदाराला क्वारंटाइन केले होते. खासगी इस्पितळात उपचार घेत असलेल्या आव्हाड यांची प्रकृती स्थिर आहे. माझी तब्येत आता खूप चांगली असून लवकरच मला घरी पाठवण्यात येईल, अशी माहिती त्यांनी ‘लोकमत’ला दिली.