CoronaVirus News: ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख चढाच
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2020 02:37 AM2020-10-04T02:37:31+5:302020-10-04T02:37:42+5:30
CoronaVirus Thane News: शनिवारी ३२ जणांचे मृत्यू, आरोग्य विभागाची माहिती
ठाणे : जिल्ह्यात शनिवारी एक हजार ५५१ नवे रुग्ण आढळल्यामुळे आतापर्यंत एक लाख ८० हजार ६९ रुग्णसंख्या झाली आहे. तर, ३२ जणांच्या मृत्यूमुळे मृतांची संख्या चार हजार ५५९ वर पोहोचली असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाने दिली.
ठाणे शहर परिसरात ४०२ रुग्ण नव्याने सापडल्याने आतापर्यंत ३७ हजार ९७५ रुग्णांची नोंद झाली असून आठ मृत्यू झाल्याने मृतांची संख्या एक हजार १८ नोंदवण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात २७७ नवीन रुग्ण आढळले असून सहा जणांचा मृत्यू झाला.
उल्हासनगरात नवे ६२ रुग्ण सापडले तर तीन मृत्यू झाले. येथे आतापर्यंत नऊ हजार ३४९ रुग्णसंख्या झाली आहे. भिवंडी मनपा क्षेत्रात २८ बाधित आढळले असून एका जणाचा मृत्यू झाला. मीरा-भार्इंदरमध्ये २०० रुग्णांसह सात मृत्यूची नोंद झाल्याने शहरात मृतांची संख्या ५८७ झाली आहे. अंबरनाथमध्ये ६८ रुग्ण सापडले असून एकाही मृताची नोंद नाही. बदलापूरमध्ये ६६ रुग्णांचा शोध नव्याने लागल्यामुळे आता बाधित सहा हजार ३३६ झाले आहेत.
जिल्ह्यात २६ जणांचा मृत्यू
अलिबाग : जिल्ह्यात शनिवारी ३६४ नव्या कोरोना पॉझिटीव्ह रु ग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या ४८ हजार ०३८ वर पोचली आहे. दिवसभरात २६ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण मृतांची संख्या १३२८ आहे तर, आतापर्यंत ४२ हजार ७०० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
वसई-विरारमध्ये १७१ नवे रुग्ण
वसई : वसई-विरार महापालिका हद्दीत शनिवारी दिवसभरात १७१ नवीन रुग्ण आढळले, मात्र त्याच वेळी दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून २०३ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. महापालिका हद्दीत आता एकूण रुग्णसंख्या २३ हजार २२९ वर पोहोचली आहे.
नवी मुंबईत ३९९ रूग्ण वाढले
नवी मुंबई : शहरात शनिवारी दिवसभरात ३९९ रूग्ण वाढले आहेत. एकूण रूग्णांची संख्या ३७८१७ झाली आहे. ३१५ रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत ३३३५३ रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.