coronavirus: ठाणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात, २६ दिवसांत आठ हजार रुग्ण कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 01:35 AM2020-10-28T01:35:18+5:302020-10-28T01:37:15+5:30
Thane CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर प्रादुर्भाव वाढू नये, याकरिता जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग तसेच जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी कंबर कसली. जीवाची पर्वा न करता एकूण यंत्रणा अहोरात्र मेहनत घेत रुग्णांचे जीव वाचवत आहे.
ठाणे - दिवसेंदिवस ठाणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असताना, या आजारातून पूर्णपणे बरे होऊन स्वगृही परतणाऱ्या रुग्णांच्या संख्येतदेखील वाढ होत आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला जिल्ह्यातील सहा महापालिका आणि ग्रामीण भागातील दाखल रुग्णांची संख्या १८ हजारांच्या घरात होती. ती आता १० हजारांवर आली आहे. मागील २६ दिवसांत ८ हजार रुग्णांनी कोरोनावर विजय मिळवला आहे.
ठाणे जिल्ह्यात मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर प्रादुर्भाव वाढू नये, याकरिता जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग तसेच जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी कंबर कसली. जीवाची पर्वा न करता एकूण यंत्रणा अहोरात्र मेहनत घेत रुग्णांचे जीव वाचवत आहे. त्याची फलश्रुती जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस रुग्णांच्या संख्येत होणारी घट, रुग्ण बरे होण्याचे वाढते प्रमाण, रुग्णालयातील रिक्त खाटा यांच्या रूपात दिसून येत आहे.
जिल्ह्यातील सहा मनपांसह शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, कल्याण आणि भिवंडी या पाच तालुक्यांतील ग्रामीण क्षेत्रात १ ऑक्टोबरला १७ हजार ६२७ रुग्ण विविध रुग्णालयांत दाखल होते. २ ऑक्टोबरला त्यात १५० ते २०० रुग्णांची वाढ झाली. त्यानंतर जिल्ह्यात रुग्णवाढीचा वेग मंदावत गेला. दुसरीकडे बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे दाखल रुग्णांची संख्या रोडावत गेल्याने २६ ऑक्टोबरला जिल्ह्यात दाखल रुग्णांची १० हजारांवर येऊन ठेपली आहे.
...अशी झाली घट
ठाणे जिल्ह्यात १ ऑक्टोबरला दाखल रुग्णांची संख्या १७ हजार ६२७ इतकी होती. २ ऑक्टोबरला त्यात वाढ होऊन १७ हजार ८३८ वर गेली. ३ ऑक्टोबरला ती १७ हजार ५४८ झाली. १० ऑक्टोबरला ती १६ हजार ३५९ वर, २६ ऑक्टोबरपर्यंत ती १० हजार ७३७ वर घसरली.
ठाणे महापालिका क्षेत्र : रुग्णदुपटीचा कालावधी १३५ वरून १६५ दिवस
ठाणे : महापालिका हद्दीत कोरोनाला अटकाव करण्यासाठी विविध स्वरूपाचे प्रयत्न सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवून दररोज ५,५९४ केले आहे. नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाणही आता घटले असून, रुग्णदुपटीचा कालावधी अवघ्या तीन दिवसांत १३५ दिवसांवरून १६५ दिवसांवर गेला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९२ टक्क्यांवर आले. याशिवाय मृत्युदरही आता २.४९ टक्क्यांवर आला आहे.
मार्च महिन्यापासून ठाण्यात कोरोना रुग्ण आढळले. जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली. सप्टेंबर महिन्यात १० हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळले व त्यापैकी ८ हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले. कोरोनाला अटकाव करण्यासाठी पालिकेने चाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे. चाचण्यांची संख्या वाढविण्यात आल्यानंतर एका रुग्णामागे ४४ जणांना क्वारंटाइन केले जात आहे. ऑगस्ट महिनाअखेर रोज सरासरी २३०० चाचण्या केल्या जात होत्या आणि त्यामध्ये दोनशेच्या आसपास रुग्ण आढळून येत होते. सप्टेंबर महिन्यापासून चाचण्यांची संख्या दुप्पट करण्यात आली. आता दिवसाला ५५०० हून अधिक चाचण्या केल्या जात आहेत.
त्यात ४०० च्या आसपास रुग्ण आढळून येते होते. परंतु आता ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असून ती २५० वरून १३० वर आली आहे. सप्टेंबर महिना अखेरपर्यंत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५ टक्के होते. ते आता ९२ टक्क्यांवर आले आहे.
मृत्युदर घटल्याने लाभला दिलासा
मागील सहा महिन्यांत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९.७३ टक्के होते. ते ऑक्टोबर अखेर ९२ टक्क्यांवर आले. नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण हे २० टक्क्यांवरून ९.४१ टक्क्यांवर आले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२ टक्क्यांवर आले असून चाचण्यांची संख्या वाढल्याने रुग्णदुपटीचा कालावधी जेमतेम तीन दिवसांत १३५ दिवसांवरून १६५ दिवसांवर आला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत ४५ हजार ५४१ रुग्ण आढळून आले. त्यापैकी ४२ हजार १११ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण ११३३ रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्युदर आता २.४९ टक्क्यांवर आला ही समाधानाची बाब आहे.